Malegaon Municipal Corporation Election Result 2026 : संपूर्ण महाराष्ट्रात भाजप-शिंदे युतीने यश मिळवले असताना, मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला आहे. येथे 'इस्लाम पार्टी' सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
मालेगाव : संपूर्ण महाराष्ट्रात भाजप आणि शिंदे गटाच्या महायुतीने विजयाचा गुलाल उधळला असताना, मालेगाव महानगरपालिकेने मात्र राज्याला धक्कादायक निकाल दिला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मुसंडी मारणाऱ्या भाजपचा मालेगावात अक्षरशः 'सुपडा साफ' झाला असून, येथे 'इस्लाम पार्टी' सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आली आहे.
'सेक्युलर फ्रंट'ची सत्ता, भाजपची दाणादाण
राज्यातील २९ महापालिकांपैकी बहुतांश ठिकाणी भाजप-शिंदे युतीने १२५ हून अधिक जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. मात्र, मालेगावमध्ये हे समीकरण पूर्णपणे उलटले आहे. येथे इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी 'सेक्युलर फ्रंट'च्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. या आघाडीने भाजप, काँग्रेस आणि ठाकरे गटाला धोबीपछाड देत सत्तेच्या चाव्या आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.
मालेगाव महापालिका, कोणाचे किती बळ?
निकालाचे चित्र स्पष्ट झाले असून पक्षनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.
पक्ष / आघाडी विजयी जागा
इस्लाम पार्टी १९
शिवसेना (एकनाथ शिंदे गट) १८
समाजवादी पार्टी ०५
एमआयएम (MIM) ०४
भारतीय जनता पक्ष (BJP) ०२
काँग्रेस ०१
अपक्ष ०१
शिंदे गटाची झुंज, पण सत्ता हुकली
मालेगावात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने १८ जागा जिंकून इस्लाम पार्टीला तगडी फाईट देण्याचा प्रयत्न केला, मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. दुसरीकडे, ज्या भाजपने मुंबईत ९९ जागांसह ऐतिहासिक विजय मिळवला, त्यांना मालेगावात अवघ्या २ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
आता इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्यातील युतीमुळे मालेगावच्या महापौरपदी कोणत्या पक्षाचा उमेदवार बसणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालाने मालेगावचा राजकीय कल राज्याच्या इतर भागांपेक्षा पूर्णपणे वेगळा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


