वडगाव ब्रिज परिसरात आज (३ मे) पहाटेच्या सुमारास सुमारे चार वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता.

पुणे – वडगाव ब्रिज परिसरात आज (३ मे) पहाटेच्या सुमारास सुमारे चार वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. भरधाव वेगाने येणाऱ्या मर्सिडीज कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने एक तरुण ठार झाला असून, तिघेजण जखमी झाले आहेत. कुणाल हुशार (पूर्ण नाव अद्याप समोर आलेले नाही) असे मृत युवकाचे नाव आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

अपघातानंतर कार खाली कोसळली

प्राथमिक माहितीनुसार, मर्सिडीज कारचा वेग अत्यंत जास्त होता. धडक लागल्यानंतर कार वडगाव पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर कोसळली. अपघात एवढा गंभीर होता की त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला.

कारमधील प्रवासी मद्यधुंद अवस्थेत

अपघातानंतर कारमधील चार जण रस्त्यावर उतरून गोंधळ घालत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक मद्यधुंद अवस्थेत होता.

पोलिसांकडून कारवाई सुरू

या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कार चालक आणि सहकाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता कलम ३०४(A) (सदोष मनुष्यवध) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपआयुक्त संभाजी कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, अपघातग्रस्त कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.