भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, विनाकारण बाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. आज हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विशेषतः कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात अलर्ट जारी केला आहे. तर पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज
आयएमडीनुसार (IMD) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई लोकलची स्थिती
पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू ते विवार पर्यंतची लोकलसेवा पूर्णपणे बंद झाली आहे. तसेच विरार-चर्चगेट दरम्यान लोकल धीम्या गतीने सुरू आहे. मध्य रेल्वे मार्गावर गाड्या १०-१५ मिनिटे उशिराने धावत आहेत. हार्बर मार्गावरील लोकलही ५-१० मिनिटे उशिरे असल्याची माहिती आहे.
उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट
पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र, पुणे घाटमाथा परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने येथे रेड अलर्ट जारी केला आहे. सातारा घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मराठवाड्यातही पावसाची हजेरी
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली जिल्ह्यांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. जालना, परभणी, बीड आणि नांदेड येथे हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भातील 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट
विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.


