Maharashtra Weather Update : राज्यात एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे तीव्र उष्णता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट, तर विदर्भ-कोकणात हीटवेव्हचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मराठवाडा भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसरीकडे कोकण आणि विदर्भ भागात उष्णतेच्या लाटेचा धोका वाढला आहे. या बदलत्या हवामानामुळे नागरिक आणि शेतकरी दोघेही चिंतेत आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

मराठवाड्यात पावसाचा इशारा, काही भागांत जोरदार सरी

भारतीय हवामान विभागाने मराठवाडातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. पुढील २४ तासांत परभणी, नांदेड आणि आसपासच्या भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याचीही शक्यता आहे.

कोकण-विदर्भात उष्णतेचा तडाखा; तापमानाचा उच्चांक

दरम्यान, विदर्भ आणि कोकण भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अमरावती येथे तब्बल 44.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच अकोला, रायगड, ठाणे, मुंबई आणि रत्नागिरी या भागांतही उष्णतेची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे.

मुंबईत अवकाळी पावसाची हजेरी; शेतीचे नुकसान

मुंबईमध्ये रात्री काही भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यभरातील शेती पिकांवर परिणाम होत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या अनिश्चित हवामानामुळे पिकांचे उत्पादन धोक्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस

पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह वारे आणि पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. हवामान खात्याने आधीच या भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला होता.

आरोग्यावर परिणाम; नागरिकांना सावधगिरीचा इशारा

सतत बदलणाऱ्या हवामानाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून, तर पावसामुळे सर्दी-तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.