भारतीय हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणे घाटमाथ्यासह पालघर, ठाणे, रायगड आणि मुंबईसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.

मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आहे. यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तसेच कोकण, मुंबई महानगर प्रदेश, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. खासकरुन पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

कोकणात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पालघर परिसरात चक्रीय वादळाची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढील 24 तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

मुंबईत मुसळधार पाऊस

मुंबईत दिवसभर जोरदार पावसाच्या सरी कायम राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर इतका राहू शकतो. त्यामुळे झाडे कोसळणे, सखल भागांत पाणी साचणे आणि वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. लक्षात घेऊन नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Scroll to load tweet…

पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट

पुणे शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असला तरी घाटमाथा आणि डोंगराळ भागांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच नाशिक आणि सातारा घाटमाथा परिसरातही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता

यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अमरावती आणि अकोला या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नागरिकांना खरबदारीचा इशारा

जोरदार पाऊस, वेगवान वारे आणि घाट परिसरातील दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.