महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरूच आहे. अशात आज कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे.

मुंबई : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दरम्यान, आज कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भातील काही भागांत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. याशिवाय काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनचा कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील बिकानेरपासून मध्य प्रदेशातील कमी दाबाचे क्षेत्र, सतना, डाल्टनगंज आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. यामुळे मध्य भारतासह दक्षिण भारतातील काही भागांत पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे काही भागांत पावसाची शक्यता वाढली आहे.

भिरामध्ये 120 मिमी पावसाची नोंद

गेल्या 24 तासांत पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर असलेल्या भिरा येथे तब्बल 120 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि घाटमाथा परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच चंद्रपूरमध्ये राज्यातील सर्वाधिक 35.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये सर्वात कमी 17.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

मुंबई-ठाण्यासह या भागांत पावसाची शक्यता

कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाची शक्यता आहे. याशिवाय नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही पावसाचा अंदाज आहे.पूर्व विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने येथे यलो अलर्ट जारी केला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील कोणत्या भागांना यलो अलर्ट?

हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, पुणे घाटमाथा, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गडचिरोली आणि गोंदिया या भागांचा समावेश आहे. काही दिवसांपासून दमदार पावसाची प्रतीक्षा असलेल्या भागांमध्ये आता पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.