कल्याणच्या आधारवाडी परिसरात रविवारी रात्री एका भटक्या कुत्र्याने अक्षरशः धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल १३० हून अधिक लोकांना चावा घेतला. या घटनेनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शोधमोहीम राबवून अखेर त्या कुत्र्याला पकडले.
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC) हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री आधारवाडी परिसरात एका भटक्या कुत्र्याने तब्बल १३० हून अधिक नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. अवघ्या सात तासांच्या या थरारानंतर प्रशासनाने शोधमोहीम सुरू केली आणि रात्री दीडच्या सुमारास त्या कुत्र्याला पकडण्यात यश आले.
रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हॉटेलजवळ एका पांढऱ्या रंगाच्या भटक्या कुत्र्याने अचानक आक्रमक होऊन रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर हल्ला करण्यास सुरुवात केली.
या घटनेत जखमी झालेल्या सुमारे १३० लोकांना केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. सर्वांना अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले. रुग्णालयाचे डॉक्टर संदीप पगारे यांनी सांगितले की, प्रत्येक रुग्णाने आपल्याला एका पांढऱ्या कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती दिली.
या घटनेनंतर केडीएमसीच्या भटके कुत्रा विभागाने या कुत्र्याला शोधण्यासाठी आणि पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. या शोधमोहिमेत स्थानिक नगरसेवक, त्यांचे कार्यकर्ते, तसेच एमएचबी आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीही सामील झाले होते.
अनेक तासांच्या शोधानंतर रात्री दीडच्या सुमारास प्रशासनाने त्या कुत्र्याला पकडले. सर्व जखमींवर पालिकेच्या रुग्णालयात अँटी-रेबीज इंजेक्शन देऊन उपचार करण्यात आले.
केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचे डॉक्टर संदीप पगारे यांनी या मोठ्या संख्येने आलेल्या रुग्णांच्या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले, “आज रुग्णालयात कुत्रा चावलेले १३० रुग्ण आले आहेत आणि त्यांना रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले आहे. या सर्वांनी आपल्याला एका पांढऱ्या कुत्र्याने चावा घेतल्याची तक्रार केली.”

