प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमाला पुणे ग्रामीण पोलिसांनी केली अटक

| Published : Jul 18 2024, 10:43 AM IST

Pooja Khedkar, Mother arrest

सार

Manorama Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. 

 

Manorama Khedkar : राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मनोरमा खेडकरचे काही दिवसांपुर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील त्यांनी हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलीस करत होते. गुरुवारी अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाड मधील हॉटेलमधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलीस त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत. मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती आहे.

पोलिसांची तीन पथके घेत होते मनोरमा खेडकरचा शोध

प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केले आहे. महाडमधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे तीन पथक त्या ठिकाणी शोध घेत होते. पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती. त्यावेळी तिने पोलिसांना दाद दिली नव्हती. नंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निर्दशनास आले होते. फोन देखील बंद असल्याचं समोर आले होते. त्यानंतर पोलिसांची ३ पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होते. गुरुवारी अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केलं आहे.

महाडमधील एका हॉटेलमधून मनोरमा खेडकरला केली अटक

अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता. खेडकरांच्या घराबाहेर नोटीस देखील लावण्यात आली होती. पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. त्यानंतर गुरुवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांचे पथक हॉटेलवरती दाखल झाले त्यानंतर मनरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे.

व्हायरल व्हिडीओनंतर मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल

पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकरवर पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पौड पोलिसांचे एक पथक बाणेर रस्त्यावर असलेल्या खेडकर यांच्या घराची पाहणी करून गेले होते. खेडकर कुटुंबाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने पोलीस निघून गेले होते. मनोरमा खेडकरने बंदुकीने शेतकऱ्यांना धमकावण्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरसह काही जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड पोलीस यासंदर्भात मनोरमा खेडकरची चौकशी करण्यासाठी आले होते. पण त्यांच्या घरी कुणीही नसल्याने पोलीस परत गेले. त्यानंतर मनोरमा खेडकर गायब झाल्याची माहिती समोर आली होती. गुरुवारी तिला महाडमधून पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी मनोरमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी घराला कुलूप असल्याने फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण फोनही लागत नसल्याचे पोलिसांनी सांगितले होते. तसेच खेडकर कुटुंबाच्या पुणे आणि आजूबाजूला असणाऱ्या फार्म हाऊसवर देखील पुणे पोलिसांनी शोध घेतला होता.

आणखी वाचा : 

लाखोंची लाच मागितली, दोनदा निलंबित; पूजाचे वडील दिलीप खेडकरांचा कारनामा उघड