गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी घोषणा केली आहे. 7 ते 25 सप्टेंबरदरम्यान मुंबई , ठाणे आणि पालघरमधून कोकणासाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.

मुंबई : येत्या 14 सप्टेंबर पासून देशभरात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशातच कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची एसटी बस, रेल्वेमध्ये मोठी गर्दी होते. अशातच यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने मोठी तयारी केली आहे. येत्या 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरदरम्यान मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणातील विविध मार्गांवर तब्बल 5,220 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.

गणेशोत्सवासाठी एसटीची मोठी तयारी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या मुख्यालयात जादा वाहतुकीच्या नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव हा कोकणवासीयांच्या भावविश्वाशी जोडलेला सण आहे. या काळात मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या भागातून मोठ्या संख्येने चाकरमाने आपल्या गावी जातात. त्यामुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटीने यंदा मोठ्या प्रमाणात जादा बसेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

7 ते 25 सप्टेंबरदरम्यान जादा बसेस

गणेशोत्सवानिमित्त 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर या कालावधीत जादा बसेस सोडल्या जाणार आहेत. मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातील प्रमुख बसस्थानकांमधून या बसेस कोकणातील विविध मार्गांवर धावतील.एसटीच्या या निर्णयामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी वाहतुकीवरील ताण कमी करण्यासोबतच प्रवाशांना सुरक्षित आणि नियोजित प्रवासाची सुविधा मिळणार आहे.

10 ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा

किमान 40 प्रवाशांच्या गटासाठी 10 ऑगस्टपासून गट आरक्षण सुरू करण्यात येणार आहे. गट आरक्षणामध्ये महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के भाडे सवलत मिळणार आहे. तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के भाडे सवलत लागू राहणार आहे. जादा बसेसचे आरक्षण एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रवाशांना प्रमुख बसस्थानकांवर आणि MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाइल अ‍ॅपद्वारेही आरक्षण करता येणार आहे.

आषाढी यात्रेप्रमाणे गणेशोत्सवासाठीही नियोजन

यापूर्वी आषाढी एकादशी यात्रेसाठी एसटी महामंडळाने सुमारे 5,200 जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या. या सेवेचा भाविक आणि प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. अशातच आता गणेशोत्सवासाठीही मोठ्या संख्येने जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बसस्थानकांवर 24 तास कर्मचारी तैनात

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रमुख बसस्थानके आणि बसथांब्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. प्रवाशांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. तसेच कोकणातील प्रमुख महामार्गांवर आवश्यक ठिकाणी वाहनदुरुस्ती पथके तैनात केली जाणार आहेत. प्रवाशांना सुरक्षित, जलद आणि अखंड बससेवा देण्यासाठी एसटी महामंडळाकडून सर्वतोपरी तयारी करण्यात आली आहे.