Dombivli Doctor Assault Case : डॉक्टरला मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेंचा जामीन रद्द करण्यात आला आहे. त्यांना पोलिसांना शरण जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यांच्या आधीच्या १७ गुन्हांबाबतही हायकोर्टाने दखल घेतली आहे.

ठाणे : डोंबिवलीमधील एका रुग्णालयात शिंदेंच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी महिला डॉक्टरला मारहाण केल्याप्रकरणी त्यांना आणि त्यांच्या चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय कारण देत ते जामिनावर होते. आता मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना देण्यात आलेला जामीन रद्द करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाने त्यांच्या जामिनाला स्थगिती दिली आहे. रविवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांना शरण यावं, अन्यथा त्यांची मालमत्ता जप्त करण्यात येईल, असे आदेश मुंबई न्यायालयाकडून त्यांना देण्यात आले आहेत.

डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी रमेश म्हात्रे आणि इतर चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यभरात २० जुलै रोजी २४ तास काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे रमेश म्हात्रे यांच्यावर आता डॉक्टरांच्या मारहाणीत दाखल करण्यात आलेला गुन्हा हा पहिलाच गुन्हा नाही. त्यांच्यावर याआधी १८ गुन्हे दाखल आहेत. मात्र १७ गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये त्यांना निर्दोष ठरवून त्यांची सुटका झाली आहे. इतके गुन्हे दाखल असतानाही रमेश म्हात्रे यांना दंडाधिकाऱ्यांनी जामीन दिल्याने हे योग्य नसल्याचे ताशेरे उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना दिलेला जामीन उच्च न्यायलयाने रद्द केला असून त्यांना पोलिसांना शरण येण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलेलं?

डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयात एक गर्भवती महिला आली होती. तिच्यावर उपचार न करता डॉक्टरांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचं सांगितलं. रमेश म्हात्रे यांनी रुग्णालयात कॉल केला, पण तिथे कॉल उचलला नसल्याने रमेश म्हात्रे त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात आले आणि डॉक्टर, त्यांच्या इतर कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यांच्या मारहाणी व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, मात्र त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना वैद्यकीय कारण देत दंडाधिकाऱ्यांकडून जामीन देण्यात आला होता. तोच जामीन आता मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला असून त्यांना पोलिसांत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.