कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कल्याणमध्ये एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Thane-Kalyan Corona Update: राज्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर साथीच्या आजारांनी जोर धरायला सुरुवात केली आहे. त्यातच करोनासारखा विसर पडलेला आजार पुन्हा एकदा डोके वर काढताना दिसतोय. ठाण्यानंतर आता कल्याणमध्ये एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आणि महापालिका सतर्क झाली असून, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

डोंबिवलीत करोनाचं पुनरागमन

डोंबिवली आणि कल्याण परिसरात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी कळवा परिसरात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला होता. आता कल्याणमध्येही एक महिला रुग्ण उपचारादरम्यान दगावल्याने खळबळ उडाली आहे.

कल्याण डोंबिवलीत चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. दुसरा रुग्ण उपचारानंतर घरी परतला आहे. तिसऱ्या रुग्णावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चौथ्या रुग्णाला कळवा येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

डॉ. दीपा शुक्ल यांचा आरोग्य सल्ला

महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचा आणि योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. “वयोवृद्धांनी गर्दी टाळावी, मास्क वापरावा, वारंवार हात धुणे आणि लक्षणं दिसल्यास त्वरित तपासणी करून उपचार घ्यावेत,” असं त्यांनी सांगितलं.

करोनाचा भूतकाळ अजूनही ताजा!

कोरोना काळात लोकांनी अनुभवलेला त्रास आजही विसरलेला नाही. लॉकडाऊन, ऑनलाईन शिक्षण, बंद शाळा, गमावलेल्या नोकऱ्या – हे सर्व आठवणींत अजूनही ताजे आहेत. त्यामुळे कोरोनाची ही वाढती चाहूल नागरिकांना पुन्हा एकदा चिंतेच्या गर्तेत ढकलते आहे.

काय खबरदारी घ्यावी?

सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरा

वारंवार हात धुवा

लक्षणं दिसल्यास विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या

गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

वयोवृद्ध आणि आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्या

तुम्हाला शंका असल्यास किंवा लक्षणं आढळल्यास, जवळच्या खाजगी किंवा महापालिका रुग्णालयात त्वरित संपर्क साधा.