Ashok Kharat Case : भोंदू अशोक खरातने “मासा म्हणजे वनस्पती” असे सांगत शाकाहारी लोकांची धार्मिक फसवणूक केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. SIT तपासात त्याच्या फसवणुकीचे नवे प्रकार समोर येत असून त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरद्वारे तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क ठेवत असल्याचेही उघड झाले आहे.
Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहेत. धार्मिक श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक करणाऱ्या खरातच्या आणखी एका धक्कादायक पद्धतीचा तपासात उलगडा झाला आहे. विशेषतः शाकाहारी नागरिकांना चुकीची माहिती देऊन त्यांच्या भावनांशी खेळ करत पैसे उकळल्याचे समोर आले आहे.
‘मासा म्हणजे वनस्पती’ सांगत लोकांची दिशाभूल
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरात हा शाकाहारी लोकांना “मासा हा पाण्यातील वनस्पती आहे” असे सांगून त्यांची दिशाभूल करत होता. प्रसादाच्या नावाखाली त्यांना मासे खाण्यास भाग पाडत असल्याचे उघड झाले आहे. काही जैन धर्मीय व्यावसायिकांनाही अशाच प्रकारे फसवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. “मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात,” अशा खोट्या दाव्यांद्वारे त्याने श्रद्धेचा गैरफायदा घेतला.
श्रद्धा आणि अंधविश्वासाचा गैरफायदा
या प्रकारातून खरातने अनेकांकडून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात स्पष्ट होत आहे. धार्मिक भावना, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा आधार घेत त्याने लोकांना जाळ्यात ओढले. विशेष तपास पथकाच्या (SIT) चौकशीत त्याच्या फसवणुकीचे विविध पैलू समोर येत असून, आणखी गंभीर गुन्हे नोंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदूगिरीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
१४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
दरम्यान, अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उद्या पुन्हा त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. तपास यंत्रणांकडून त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चार मोबाईल नंबरचा वेगवेगळा वापर
SIT तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अशोक खरात चार वेगवेगळे मोबाईल नंबर वापरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. एक नंबर फक्त व्हीआयपी व्यक्तींशी संपर्कासाठी, दुसरा काही निवडक भक्त आणि महिलांसाठी, तिसरा आर्थिक व्यवहारांसाठी आणि चौथा सर्वसामान्य लोकांशी संपर्कासाठी वापरला जात होता. फॉरेन्सिक पथकाकडून या मोबाईल डेटाची तपासणी सुरू असून, यातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


