Maharashtra : बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाबाबत चर्चा सुरू झाली आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. 

Maharashtra : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. विमान अपघातात झालेल्या त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. या अंत्यसंस्कारावेळी पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. मात्र अंत्यविधीनंतरच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला असून नेतृत्वाच्या प्रश्नावर चर्चा रंगू लागली आहे.

अंत्यसंस्कारानंतर मोठी राजकीय मागणी

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य करत राजकीय चर्चांना उधाण आणले. अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात यावे, अशी अप्रत्यक्ष मागणी त्यांनी केली. “सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे की सुनेत्रा वहिनींना मंत्रिमंडळात आणावे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत, आता वेगळे राहून चालणार नाही,” असे झिरवळ यांनी स्पष्ट केले.

राजकीय वारसदार कोण? चर्चेला उधाण

अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, बारामतीचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते होते. त्यांच्या निधनानंतर ही सर्व जबाबदारी कोण सांभाळणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी पार्थ पवार आणि जय पवार हेच सर्व नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते, तर इतर नेते खाली बसलेले दिसले. त्यामुळे अजित पवारांचे राजकीय वारसदार म्हणून पार्थ आणि जय पवार यांची भूमिका अधोरेखित झाल्याची चर्चा आहे.

पवार कुटुंबाची राजकीय रणनीती

पवार कुटुंबीय नेहमीच राजकारणात व्यावहारिक आणि परिस्थितीनुसार निर्णय घेणारे म्हणून ओळखले जातात. अजित पवार यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीमुळे पक्षात गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी आताच हालचाली सुरू झाल्याचे चित्र आहे. नेतृत्व आणि उपमुख्यमंत्रीपदाबाबत पुढील काही दिवसांत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.