Winter Health Care : हिवाळ्यात दही खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपार, कारण या वेळी ते सहज पचते. रात्री आणि सकाळी रिकाम्या पोटी दही टाळावे.

Winter Health Care : हिवाळ्यात दही खावे की नाही, आणि खायचे तर कोणत्या वेळी खावे हा अनेकांचा मोठा प्रश्न असतो. दही शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, प्रोबायोटिक्स आणि इम्युनिटी वाढवणारे घटक देते. मात्र थंड प्रवृत्तीचे असल्यामुळे चुकीच्या वेळी दही खाल्ल्यास सर्दी, कफ, पोटात गॅस किंवा अपचनासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे दही कधी, कसे आणि किती प्रमाणात खावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

दुपारचा वेळ सर्वात योग्य

आयुर्वेदानुसार, हिवाळ्यात दही खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपार. दुपारी शरीरातील पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते. या वेळी दही खाल्ल्यास ते सहज पचते आणि त्यातील कॅल्शियम हाडांना अधिक चांगल्या प्रकारे मिळते. दहीसोबत काळे मीठ किंवा भाजलेल्या जिर्‍याची पूड घेतल्यास ते अधिक हलके आणि पचनास योग्य राहते.

रात्री दही टाळा

थंडीत रात्री दही खाणे टाळावे. दही थंड प्रवृत्तीचे असल्याने रात्री ते खाल्ल्यास कफ वाढतो, सर्दी–खोकला होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय रात्री शरीरातील डाइजेशन प्रोसेस कमी असते, ज्यामुळे दही पचायला वेळ लागतो आणि पोट फुगणे किंवा जडपणा जाणवतो. जर खायलाच हवे असेल तर दहीऐवजी गरम ताक किंवा सूप उत्तम पर्याय आहे.

सकाळी रिकाम्या पोटी दही योग्य नाही

हिवाळ्यात सकाळी दही रिकाम्या पोटी खाणे टाळावे. सकाळची वेळ शरीरासाठी कोरडी असते, तर दही ओलसर-थंड प्रवृत्तीचे असते. यामुळे पचनक्रिया मंदावू शकते आणि दिवसभर कफ वाढणे, अपचन, थकवा जाणवू शकतो. त्याऐवजी सकाळी उबदार दूध, ओट्स किंवा ग्रीन टी यांचा समावेश करणं अधिक फायदेशीर आहे.

संध्याकाळी हलक्या पदार्थांसोबत खा

जर तुम्हाला दही खूप आवडत असेल तर संध्याकाळी फार थंड नसलेल्या दहीचे सेवन करू शकता. मात्र ते उकडलेल्या भाज्या, सलाड, पोळी किंवा खिचडीसोबत मिसळून खावे. यामुळे दही शरीरात अतिथंडपणा निर्माण करत नाही आणि ते सहज पचते. दही घेताना साखर टाळा कारण साखर दहीच्या थंड गुणधर्मांना आणखी वाढवू शकते.

योग्य प्रमाण आणि पद्धत महत्त्वाची

दही पौष्टिक असले तरी त्याचे प्रमाण मर्यादित असावे. दिवसातून अर्धा ते एक वाडगा दही पुरेसे असते. दही कधीही फ्रिजमधून काढून लगेच खाऊ नये. ते रूम टेंपरेचरला आल्यानंतरच खावे. हिवाळ्यात दही किंचित आंबट असेल तर पचनास अधिक जड जाते, त्यामुळे ताजे दही निवडावे. दहीसोबत जिर्‍याची पूड, मिरी किंवा हळद घेतल्यास त्याचे थंड गुणधर्म कमी होतात आणि इम्युनिटी वाढते.