रात्री जेवण झाल्यावर भांडी घासण्याचा अनेकांना कंटाळा येतो. त्यामुळे बरेच जण खरकटी भांडी सिंकमध्ये तशीच भिजत ठेवतात आणि झोपून जातात. पण रात्रभर भांडी पाण्यात भिजत ठेवणं खरंच योग्य आहे का? या सवयीमुळे काय नुकसान होऊ शकतं, ते जाणून घेऊया.

स्वयंपाकघर स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी झुरळं आणि कीटकांचा वावर वाढतो. त्यामुळे रात्री किचन ओटा स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असतं. पण जर तुम्ही रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी तशीच ठेवत असाल, तर त्याचे काय परिणाम होतात हे तुम्हाला माहितीये का?

कीटकांचा सुळसुळाट वाढतो

खरकट्या भांड्यांवर उरलेलं अन्न आणि त्याच्या वासामुळे मुंग्या, झुरळं, उंदीर आणि इतर कीटक आकर्षित होतात. अन्नाच्या शोधात ते घरात शिरतात आणि तुमचं स्वयंपाकघर या कीटकांचं घर बनून जातं.

रात्रभर भांडी भिजत ठेवल्यास काय होतं?

भांड्यांना चिकटलेलं अन्न सहज निघावं म्हणून ती थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवणं चुकीचं नाही. पण जेव्हा तुम्ही ती रात्रभर पाण्यात तशीच सोडून देता, तेव्हा खरी समस्या सुरू होते. खरकट्या भांड्यांमधील अन्नाचे कण पाण्यात मिसळतात. जास्त वेळ ती तशीच राहिल्यास त्यात बॅक्टेरिया वाढू लागतात. थोड्या वेळातच हे पाणी घाणेरडं आणि चिकट होऊन जातं.

भांड्यांना येणारी दुर्गंधी

खरकटी भांडी आणि अन्नाचे कण सिंकमध्ये जास्त वेळ पडून राहिल्याने किचनमध्ये दुर्गंधी पसरते. या उग्र वासाचा परिणाम आजूबाजूच्या वस्तू, अन्न, कपडे आणि स्पंजवरही होतो. लाकडी वस्तूंवर याचा सर्वात जास्त परिणाम होतो, कारण त्या ओलावा आणि वास लवकर शोषून घेतात. याशिवाय, त्यांच्या बारीक भेगांमध्ये बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात. म्हणूनच खरकटी भांडी जास्त वेळ सिंकमध्ये ठेवणं ही स्वच्छतेच्या दृष्टीने चांगली सवय मानली जात नाही.

भांडी कधी घासावीत?

जेवण झाल्यावर लगेच भांडी घासणं ही सर्वात चांगली सवय आहे. जर लगेच भांडी घासणं शक्य नसेल, तर किमान ती पाण्याने विसळून तरी ठेवा. जेणेकरून अन्न सुकणार नाही आणि भांड्यांना चिकटून राहणार नाही. दुसऱ्या दिवसापर्यंत भांडी तशीच ठेवण्यापेक्षा थोड्या वेळाने ती स्वच्छ करणं कधीही चांगलं.

ही सवय आहे फायद्याची

स्वयंपाकघर स्वच्छ ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे झोपण्यापूर्वी सिंक रिकामं करणं. भांडी घासण्यासोबतच सिंकमध्ये अन्नाचे कोणतेही कण अडकलेले नाहीत, याची खात्री करा. जर तुम्ही कच्चं मांस हाताळलं असेल, तर तो भाग साबण आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.