हिवाळ्यात श्वसनसंस्थेवर जास्त ताण पडतो. त्यातच हवामानातील बदलामुळे होणारे संसर्ग आणि हवेची खालावलेली गुणवत्ता यामुळे समस्या आणखी गंभीर होऊ शकतात.
हिवाळ्यात तुम्ही वारंवार आजारी पडता हे तुमच्या लक्षात आलंय का? थंडीच्या दिवसांत अनेकजण सर्दी, खोकला, घसा खवखवणे, ताप आणि तापमान कमी झाल्यामुळे श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारी करतात. हिवाळ्यात तापमान, आर्द्रता आणि जीवनशैलीत अनेक बदल होतात, ज्याचा शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
हिवाळ्याच्या दिवसांत श्वसनसंस्थेवर अधिक ताण पडतो. त्यातच हवामानातील बदलांमुळे होणारे इन्फेक्शन आणि हवेच्या गुणवत्तेतील घट या गोष्टी एकत्र आल्यावर समस्या आणखी वाढू शकतात. यामुळे श्वसनाशी संबंधित लक्षणांवर नियंत्रण ठेवणं कठीण होतं आणि आजारातून बरं व्हायला जास्त वेळ लागतो, असं वैशाली (गाझियाबाद) मधील मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या थोरॅसिक सर्जरी विभागाचे संचालक डॉ. रवींद्र कुमार दिवान सांगतात.
थंड आणि कोरड्या हवेमुळे संवेदनशील श्वसनमार्गात जळजळ होऊ शकते आणि श्वसननलिका आकुंचन पावू शकतात. त्याच वेळी हवेतील सूक्ष्म कण (PM2.5) फुफ्फुसांमध्ये खोलवर शिरू शकतात. यामुळे सूज येऊ शकते आणि शरीराची नैसर्गिक श्वसन संरक्षण प्रणाली कमकुवत होऊ शकते.
काय झालं?
प्रदूषणामुळे थेट व्हायरल इन्फेक्शन होत नसलं, तरी त्यामुळे श्वसनमार्गाचे संसर्ग होण्याचा धोका वाढू शकतो आणि त्यांची तीव्रताही वाढू शकते, असं तज्ज्ञ सांगतात. अस्थमा, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) आणि ब्रॉन्किएक्टेसिस यांसारखे आधीच फुफ्फुसांचे आजार असलेल्यांना याचा जास्त धोका असतो. लहान मुलं, वृद्ध आणि हृदयविकार असलेल्या व्यक्तींचाही या उच्च-धोका असलेल्या गटात समावेश होतो.
निरोगी व्यक्तींनाही इन्फेक्शननंतर दीर्घकाळ खोकला राहू शकतो. श्वसनमार्गातील सूज आणि श्वसननलिकांची अतिसंवेदनशीलता कायम राहिल्याने असं होतं. प्रदूषणामुळे होणारा त्रास आणि इन्फेक्शन यांच्यातील फरक ओळखणं कधीकधी कठीण जाऊ शकतं. विशेषतः या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होण्याची शक्यता असल्याने.
श्वसनसंस्थेच्या संसर्गासाठी वारंवार अँटीबायोटिक्सचा वापर करू नये. कारण, कोणत्याही गुंतागुंतीशिवाय होणारे बहुतांश तीव्र श्वसन संसर्ग हे व्हायरसमुळे होतात आणि त्यासाठी अँटीबायोटिक उपचारांची गरज नसते.


