Fictosexuality म्हंजी काय रं भाऊ? तरुणांत वाढतोय लैंगिक आकर्षणाचा नवा ट्रेंड
Understanding Fictosexuality : पुरुषांना स्त्रियांबद्दल आणि स्त्रियांना पुरुषांबद्दल आकर्षण वाटणं सामान्य आहे. पण काल्पनिक पात्रांबद्दल असं आकर्षण वाटलं तर? ऐकायला विचित्र वाटत असलं तरी, आता हा ट्रेंड वाढत असल्याचं अभ्यासातून समोर आलं आहे.

फिक्टोसेक्शुअलिटी म्हणजे काय?
फिक्टोसेक्शुअलिटी हा एक प्रकारचा लैंगिक कल आहे. यात व्यक्ती खऱ्या माणसांपेक्षा काल्पनिक पात्रांबद्दल भावनिक प्रेम आणि आकर्षण दाखवतात. पुस्तकं, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही शो आणि व्हिडिओ गेम्समधील पात्रं त्यांना जवळची वाटतात. थेरपिस्ट रेबेका मायनर यांच्या मते, फिक्टोसेक्शुअल व्यक्तींना वाटणारं नातं काल्पनिक नसतं. ते खऱ्या भावनांनी जोडलेलं असतं.
काल्पनिक पात्रांबद्दल इतकं तीव्र आकर्षण का?
डार्सीसारखा गंभीर स्वभाव, चँडलर बिंगसारखा विनोद अनेकांना आकर्षित करतो. काहींना खऱ्या आयुष्यात अशी व्यक्ती मिळावी असं वाटतं. तर काहीजण त्या काल्पनिक पात्रांशीच भावनिक नातं जोडतात. ती पात्रं त्यांना समजून घेतात, सुरक्षितता देतात असं वाटतं. प्रेमात जखमा न मिळणं हेही एक कारण आहे.
फिक्टोसेक्शुअल म्हणजे असेक्शुअल असणंच गरजेचं आहे का?
असं गरजेचं नाही. प्रत्येक व्यक्ती लैंगिक आकर्षण वेगवेगळ्या प्रकारे अनुभवते. फिक्टोसेक्शुअल व्यक्ती स्ट्रेट, गे, पॅनसेक्शुअल किंवा ओमनीसेक्शुअल म्हणूनही स्वतःची ओळख ठेवू शकते. काहीजण असेक्शुअल वर्गात येतात, तर काहीजण नाही. शेवटी, व्यक्ती आपल्या ओळखीसह आनंदी असणं महत्त्वाचं आहे.
फिक्टोसेक्शुअलिटी आता जास्त का दिसत आहे?
AI तंत्रज्ञानाने मोठे बदल घडवले आहेत. अनेकजण AI चॅटबॉट्ससोबत प्रेमसंबंध जोडत आहेत. पतीला सोडून AI बॉयफ्रेंडसोबत राहणं, जोडीदाराच्या मृत्यूनंतर AI मध्ये प्रेम शोधणं, AI बॉटशी लग्न करणं अशा घटना चर्चेत आल्या आहेत. फिक्टोसेक्शुअल व्यक्तींना AI पार्टनर विश्वास आणि सुरक्षितता देतात. फसवणूक किंवा सोडून जाण्याची भीती नसते.
फिक्टोसेक्शुअलिटीमध्ये आकर्षण काय आहे?
जपानच्या अकिहिको कोंडो यांनी 2018 मध्ये होलोग्राम पॉप स्टार मिकूशी लग्न केले. त्यांच्या मते, मिकू कधीही विश्वासघात करणार नाही किंवा मरणार नाही. संशोधकांच्या मते, नकार मिळण्याची शक्यता नसणं हे मुख्य कारण आहे. या व्हर्च्युअल नात्यांवर पूर्ण नियंत्रण ठेवता येतं. वेळ, वेग आणि मर्यादा व्यक्ती स्वतः ठरवू शकते.

