Travel Tips: हिवाळा म्हणजे कुठेना कुठे तरी पर्यटनाला जाण्याचे बेत आखले जातात. नाताळपूर्वी सिक्कीमचे उंच पर्वतीय भाग बर्फाच्या चादरीने झाकले जाणार आहेत. हवामान खात्याच्या सूत्रांकडून तरी असेच संकेत मिळत आहेत.

Travel Tips : हिवाळा ऋतू हा पर्यटनासाठी योग्य काळ समजला जातो. दिवाळीच्या सुट्टीतच डिसेंबर आणि जानेवारीत कुठे जायचे, याचे बेत आखण्यास सुरुवात होते. पर्यटनासाठी साधारणपणे एकतर किनारपट्टी म्हणजेच बीचेस किंवा हिमवृष्टी होणारा परिसर याला पसंती दिली जाते. त्यातही फार गजबज नसलेली ठिकाणे कोणती, याचा शोध सुरू होतो. कारण ट्रिपला तर जायचेच, त्यातही ती अविस्मरणीय देखील झाली पाहिजे. मग अशावेळी एक ठिकाण आम्ही तुम्हाला सुचवतो.

सिक्कीमच्या विविध भागांत बर्फवृष्टी होण्याचा अंदाज होता. तो खरा ठरवत सिक्कीम आणि दार्जिलिंगच्या उंच भागांमध्ये बर्फवृष्टी सुरू झाली आहे. दार्जिलिंगच्या संदकफू आणि सीमावर्ती भागातही बर्फवृष्टी झाली. याचबरोबर सिक्कीमच्या पेलिंग आणि लाचुंगमध्ये मंगळवार रात्रीपासून सलग बर्फवृष्टी सुरू आहे. लाचुंग ते पेलिंग, रावंगला, छांगूसह विस्तीर्ण परिसरात बर्फवृष्टी झाल्याने सर्वत्र पांढरी चादर पसरली आहे. हिवाळ्याच्या हंगामातील या भागातील ही पहिलीच बर्फवृष्टी आहे.

उत्तर सिक्कीममधील लाचुंगसह विविध भागांत बर्फवृष्टीसोबतच तापमानातही घट झाली आहे. कडाक्याच्या थंडीने सिक्कीमचे डोंगर थरथरत आहेत. याचबरोबर बुधवारी तिथे गारपीटही झाली. रावंगला परिसरात गारपीट झाली. मात्र, या वर्षातील ही पहिली बर्फवृष्टी नाही. यंदा सिक्कीममध्ये पहिली बर्फवृष्टी 18 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्यावेळी जुलुक, छांगू आणि आसपासचा परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकला गेला होता. तिथे साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीच्या सुरुवातीला बर्फवृष्टी होते. पण इतक्या लवकर सिक्कीममध्ये कधीही बर्फवृष्टी झाली नव्हती. नाताळपूर्वीच लागोपाठ बर्फवृष्टी आणि गारपीट झाल्याने पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सोमवारी सिक्कीमच्या गंगटोकमधील किमान तापमान 8 ते 9 अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मंगणचे किमान तापमान 10 अंश सेल्सिअस होते. दार्जिलिंगमध्ये बर्फ पडण्याची शक्यता आहे का? मॉल रोड बर्फाने झाकला जाईल का? उत्तरेकडील हवामान काय सांगते? दार्जिलिंगमध्ये सध्या कडाक्याची थंडी आहे. या थंड हवेच्या शहराचे किमान तापमान 4 ते 6 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. पण नाताळमध्ये दार्जिलिंगमध्ये बर्फ पडण्याच्या शक्यतेवर हवामान तज्ज्ञांनी पाणी फेरले आहे. 

हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की, सिक्कीममधील पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील मैदानी जिल्ह्यांमध्ये कडाक्याची थंडी पडणार आहे. या आठवड्यात दार्जिलिंग आणि कालिम्पॉंगमध्ये हाडे गोठवणारी थंडी असेल. दार्जिलिंगचे किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहू शकते. जलपाईगुडी, अलीपुरद्वार, कूचबिहारमध्ये थंडी आणि धुक्याचा जोर जास्त असेल.