सार

गुढीपाडव्याला कडू लिंबाचा पाला आणि गुळ खाण्याचे पारंपारिक आणि आरोग्यदायी फायदे जाणून घ्या. 

लाईफस्टाईल डेस्क : गुढी पाडव्याला अनेकजण लहानपणा पासून कडू लिंबाची पाने आणि गुळ घालून एक चटणी तयार केली जाते. ती चटणी अनेकजण खात असतील. कडू लागते म्हणून टाळाटाळ करणाऱ्या लहान मुलांना आई किंवा घरातील मोठी मंडळी जबरदस्तीने खायला सांगतात. पण ते खाण्या मागचे कारण अनेकांना माहीत आहे का ? हे मिश्रण याच दिवशी का खाल्ले जाते? जाणून घ्या यामागचे कारण आणि त्यातून मिळणारे आरोग्यदायी फायदे .

गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने आणि गुळाचे सेवन करण्याची विशेष परंपरा आहे. मराठी नूतन वर्षाची आरोग्यदायी सुरुवात करण्याची ही प्रथा आहे. उन्हाळा बाधू नये तसेच आरोग्य निरोगी राहावे, यासाठी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

गुढी पाडव्यालाच कडूलिंबाची पाने आणि गुळ एकत्र करून का खाल्ले जाते?

सण साजरे करण्यामागील धार्मिक, पारंपरिक महत्त्वाशिवाय नैसर्गिक संबंध आपल्या आरोग्याशी जोडले गेले आहे. बदलत्या ऋतूनुसार खाण्याचे आणि सणाचे महत्व आहे. गुढी पाडव्याला कडू लिंबाची पाने आणि गुळ वापरून तयार केलेली चटणी प्रसाद म्हणून दिला जाते. त्यामागे विशेष कारण आहे, गुढी पाडव्यापासून कडक उन्हाळा सुरू होतो. या काळामध्ये वाढत्या उष्णतेचा शरीरावर परिणाम होत असतो. यात मग त्वचेचे रोग अधिक प्रमाणात वाढतात. शिवाय ही पाने रक्तशुद्धीकरणासाठी देखील मदत करतात. त्यामुळे वर्षभर निरोगी राहण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन करण्याची परंपरा आहे.

कडू लिंब आणि गुळ खाल्ल्याने काय होते ?

उन्हाळ्यातील वाढत्या उष्णतेचा परिणाम शरीरावर होत असतो. शरीराचे तापमान वाढल्यामुळे अनेक समस्या उद्भवतात. जसे की भूक न लागणे, त्वचाविकार , सांधेदुखी, तोंडाचे विकार यांसारख्या कित्येक उन्हाळी आजारांवर कडुलिंबाचा पाला आणि गूळ रामबाण आयुर्वेदिक उपाय मानला जातो. केवळ गुढी पाडव्याच्या दिवशीच नव्हे तर, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आपण दैनंदिन स्वरुपातही कडुलिंबाची पाने आणि गुळाचे सेवन केल्यास आरोग्यदायी फायदे मिळू शकतात.

कडू लिंबाचे आरोग्यविषयक फायदे कोणते ?

कडू लिंबाच्या पानांची चव कडू जरी असले तरी त्याचे फायदे गोड आहेत. खास करून उन्हाळ्यात कडूलिंबाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. कडक उन्हाळ्यातील उष्णतेपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचे वेगवेगळ्या स्वरुपात सेवन केले जाऊ शकते. कडुलिंबामध्ये अँटी बॅक्टेरिअल, अँटी - फंगल, अँटी - ऑक्सिडंट आणि अँटी-व्हायरल यासारखे गुणधर्म आढळतात. तसे यामध्ये प्रोटीन, कॅल्शिअम, व्हिटॅमिन सी, फायबर, फॉस्फरस, पोटॅशिअम यासारख्या पोषण तत्त्वांचाही मोठ्या प्रमाणात समावेश असतो.

गुळाचे आरोग्यविषयक फायदे काय ?

गुळ हे देखील वाढलेले वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय आहे. अॅनिमियासारख्या लाल रक्त पेशींची संख्या कमी करणाऱ्या समस्यांपासून बचाव करते. त्यामुळे उन्हाळी थकवा आणि अशक्तपणा जाणवत नाही. कडूलिंबाप्रमाणे गुळ देखील त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. गुळामध्ये अँटी- मायक्रोबिअल गुणधर्म असतात.

यंदा गुढीपाडवा कधी?

उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. प्रवीण द्विवेदी यांच्यानुसार यंदा गुडीपाडव्याचा सण शुक्ल पक्षातील प्रतिपदा 8 एप्रिलपासून रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुरूवात होणार असून 9 एप्रिलला रात्री 8 वाजून 31 मिनिटांनी संपणार आहे. चैत्र प्रतिप्रदेच्या तिथीचा सुर्योदय 9 एप्रिल (मंगळवारी) होणार आहे. यामुळे यंदाच्या वर्षी गुढीपाडवा 9 एप्रिलला साजरा केला जाणार आहेय या दिवसापासून हिंदू नववर्ष 2081 देखील सुरू होणार आहे.

का साजरा केला जातो गुढीपाडव्याचा सण?

पौराणिक कथांनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी सृष्टीची रचना ब्रम्हदेवांनी केली होती. यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रम्हदेवांचे विशेष महत्त्व आहे. आणखी एका मान्यतेनुसार, या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांनाचा युद्धात पराभव केला होता. यामुळे गुढीपाडव्याच्या निमित्त असे म्हटले जाते की, वाईट गोष्टींचा अंत होऊन आयुष्यात सुख-समृद्धी येते.