बहुतांशजणांच्या घरात लाकडी फर्निचरला वाळवी लागून ते खराब होते. अशातच पावसाळ्यात वाळवीपासून फर्निचरचे संरक्षण कसे करावे याबद्दलच्या काही खास आणि सोप्या टिप्स जाणून घेऊया.
मुंबई : पावसाळा म्हणजे थंडगार हवा, सरींचा आनंद, पण यासोबतच ओलावा आणि दमटपणामुळे घरातील लाकडी फर्निचरवर संकट आणणारी वाळवी (Termites) ही एक मोठी अडचण बनते. वाळवी लाकूड खाऊन टाकते आणि जर यावर वेळीच उपाय केला नाही, तर महागडं फर्निचर काही दिवसांतच खराब होऊ शकतं. म्हणूनच पावसाळ्यात फर्निचर वाचवण्यासाठी खाली दिलेले घरगुती, सहज वापरता येतील असे उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरतील.
फर्निचरला नेहमी कोरडे ठेवा
पावसाळ्यात घरामध्ये ओलावा वाढतो आणि याच ओलाव्यातून वाळवी सक्रिय होते. फर्निचरचा जमिनीशी थेट संपर्क टाळा. शक्य असल्यास लाकडी फर्निचर थोडं उंचावर ठेवा.दररोज कोरड्या कपड्यानं फर्निचर पुसा आणि जर शक्य असेल तर दर काही दिवसांनी उन्हात फर्निचर ठेवण्याचा प्रयत्न करा. ओलसरपणा कमी झाल्यास वाळवीचा प्रादुर्भाव कमी होतो.

नीम तेल किंवा करंज तेलाचा वापर करा
नीम तेल आणि करंज तेल यामध्ये नैसर्गिक कीटकनाशक गुणधर्म असतात. फर्निचरच्या कोपऱ्यात, खाचा आणि जोडांमध्ये हे तेल लावल्याने वाळवीपासून संरक्षण मिळते.फक्त एक छोटा ब्रश घ्या आणि या तेलाचा एक थर फर्निचरवर लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास चांगले परिणाम दिसून येतात.
बोरिक पावडरचा वापर
बोरिक ऍसिड पावडर वाळवी नियंत्रणासाठी प्रभावी मानली जाते.एका पाण्याच्या बाटलीत थोडेसे बोरिक पावडर आणि साखर मिसळून मिश्रण तयार करा. हे मिश्रण फर्निचरभोवती किंवा वाळवी दिसत असलेल्या जागांवर फवारणी स्वरूपात वापरा. बोरिक मिश्रण वाळवीसाठी विषारी असते.
कपूरचा धूर
कपूरमध्ये जीवाणूनाशक आणि कीटकनाशक गुणधर्म असतात. कपाट किंवा ड्रॉवरमध्ये कपूरचे काही तुकडे ठेवावेत. हे वासाने वाळवी आणि इतर कीटकांना दूर ठेवते.

व्हिनेगर आणि लिंबाचा रस
व्हिनेगर आणि लिंबाचा रस मिसळून एक घरगुती कीटकनाशक तयार करता येते. याचा स्प्रे तयार करून फर्निचरच्या कोपऱ्यांमध्ये, तडे गेलेल्या भागात आणि फटींमध्ये फवारणी केल्यास वाळवीपासून संरक्षण मिळते.
डॅम्प प्रूफिंग आणि फर्निचरवर वार्निश लावा
फर्निचरला वाळवी लागू नये म्हणून सुरुवातीपासूनच वॉटरप्रूफ आणि अँटी-टर्माइट कोटिंग लावणे हा सर्वोत्तम उपाय ठरतो. बाजारात यासाठी अनेक प्रकारचे वॉटरप्रूफ वार्निश, पॉलिश आणि अँटी-टर्माइट केमिकल्स उपलब्ध आहेत.


