Biscuit Holes : बिस्किटांवर छोटी-छोटी छिद्रे का असतात माहितीये का?
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बिस्किटं खायला खूप आवडतात. तुम्हीही बिस्किटांवर असलेली छोटी छोटी छिद्रे नक्कीच पाहिली असतील. पण ही छिद्रे नेमकी का असतात? यामागे एक खूप रंजक विज्ञान दडलंय. यामागचं नेमकं कारण काय?
बिस्किटांवर छिद्रे का असतात?
चहासोबत बिस्किटं खाण्याची मजा काही औरच असते. प्रवासात किंवा संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी आपण अनेकदा बिस्किटं खातो. पण बिस्किटं खाताना त्यावर असलेल्या छोट्या छिद्रांकडे तुमचं कधी लक्ष गेलंय का? ही छिद्रे फक्त बिस्किटांच्या डिझाईनसाठी नसतात. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. ओव्हनमध्ये बेक करताना बिस्किटांचा आकार बिघडू नये, यासाठी कंपन्या ही छिद्रे पाडतात. बिस्किटं बनवण्यासाठी पीठ, पाणी, साखर आणि फॅट्स एकत्र करून मळतात. त्यानंतर हे पीठ लाटून, त्याला आकार देऊन ओव्हनमध्ये बेक करायला ठेवतात. बेक करताना उष्णतेमुळे पिठातील ओलावा वाफेत बदलतो. या वाफेला बाहेर पडायला जागा मिळाली नाही, तर बिस्किटं फुगू शकतात किंवा त्यावर बुडबुडे येऊ शकतात. यामुळे बिस्किटांचा आकार तर बिघडतोच, पण ती सगळीकडून सारखी भाजलीही जात नाहीत. म्हणूनच ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी पिठावर छोटी छिद्रे पाडतात, जेणेकरून वाफ सहज बाहेर पडू शकेल.

बेकिंगच्या वेळी...
बिस्किटं सगळीकडून एकसारखी बेक होण्यासाठी या छिद्रांची खूप मदत होते. बिस्किट बनवताना त्याची जाडी, पिठातील ओलावा आणि वापरलेले पदार्थ खूप महत्त्वाचे असतात. बेकिंगच्या वेळी एकाच ठिकाणी जास्त वाफ साचली, तर तिथे बिस्किट फुगण्याची शक्यता असते. छिद्रे असल्यामुळे ही समस्या बऱ्याच अंशी कमी होते. परिणामी, बिस्किटं शक्य तितकी सपाट आणि एकाच आकाराची तयार होतात. विशेषतः मोठ्या कारखान्यांमध्ये हजारो बिस्किटं बनवली जातात. तिथे प्रत्येक बिस्किट दिसायला सारखं असणं आणि त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवणं गरजेचं असतं. यासाठी ही छोटी छिद्रे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात.
कुरकुरीतपणासाठी...
बिस्किटांना छान कुरकुरीतपणा आणण्यातही या छिद्रांचा मोठा वाटा असतो. विशेषतः पातळ बिस्किटांमध्ये पिठातील वाफेमुळे मोठे हवेचे बुडबुडे तयार झाले, तर त्यांचा आकार पूर्णपणे बिघडू शकतो. छिद्रे पाडल्यामुळे पिठातील वाफ बाहेर पडायला रस्ता मिळतो. यामुळे बिस्किटं विनाकारण फुगत नाहीत आणि त्यांना हवा तसा आकार मिळतो. पण बिस्किटं कुरकुरीत होण्यामागे फक्त छिद्रे हेच एकमेव कारण नसतं. पिठात वापरलेले पदार्थ, ओलाव्याचं प्रमाण, बेकिंगचं तापमान आणि बेक करण्यासाठी लागणारा वेळ या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात.
सगळ्याच बिस्किटांवर छिद्रे का नसतात?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सगळ्याच प्रकारच्या बिस्किटांवर छिद्रे का नसतात? याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक बिस्किट बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही बिस्किटांवर छोटी छिद्रे स्पष्ट दिसतात. पण क्रीम बिस्किटे, चॉकलेट कुकीज आणि काही मऊ बिस्किटांवर अशी छिद्रे दिसत नाहीत. प्रत्येक बिस्किटाचा आकार, जाडी, पिठाचा प्रकार आणि बनवण्याची पद्धत यावर छिद्रे पाडायची की नाही हे ठरवतात. काही बिस्किटांवर दिसणारे ठिपके किंवा रेषा फक्त सजावटीसाठीही असू शकतात. त्यामुळे बिस्किटावर दिसणाऱ्या प्रत्येक छिद्रामागे एकच कारण असेल असं नाही.
खास मशिन्सचा वापर...
कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बिस्किटं बनवताना खास रोलर्स किंवा छिद्रे पाडणारी मशिन्स वापरतात. पीठ पातळ लाटून घेतल्यानंतर या मशिन्सच्या मदतीने त्यावर एकाच आकाराची अनेक छिद्रे पाडतात. यामुळे हजारो बिस्किटांवर अगदी एकसारखी छिद्रे तयार होतात. असं केल्यामुळे बिस्किटं बनवण्याचं काम वेगाने तर होतंच, पण बिस्किटांचा आकार आणि जाडी यावरही सहज नियंत्रण ठेवता येतं.






