Beauty Tips : भाजलेली हळद मिनिटांत देईल चेहऱ्यावर येईल ग्लो, फेशियलची गरजच नाही
सण-समारंभासाठी पार्लरमध्ये जाऊन महागडे फेशियल करताय? थांबा! आता खर्च न करता घरच्या घरी हळदीचा वापर करून चेहऱ्यावर फेशियलसारखा ग्लो आणू शकता. यासाठी फक्त हळद पुरेशी आहे.

कोरा हळद फेस मास्क
एका पॅनमध्ये भाजलेली हळद, मध आणि गुलाबजल एकत्र करून हा फेसपॅक तयार करतात. हा पॅक चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुतल्यास चेहऱ्यावर जबरदस्त ग्लो येतो, असं व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितलं आहे. घरगुती आणि कमी खर्चात होणारा हा जुन्या पद्धतीचा उपाय सर्वांनाच आकर्षित करत आहे.
हा मास्क कसा तयार करायचा?
लागणारे साहित्य -
भाजलेली हळद – १ चमचा
मध – १ चमचा
गुलाबजल – १ ते २ चमचे
कृती - सर्वात आधी हळद एका पॅनमध्ये कोरडी भाजून घ्या आणि पूर्णपणे थंड होऊ द्या. थंड झालेल्या हळदीत मध घाला आणि नंतर पेस्ट तयार होईपर्यंत हळूहळू गुलाबजल घालून एकत्र करा. चेहरा स्वच्छ धुतल्यावर, डोळे आणि ओठांच्या आसपासचा भाग सोडून संपूर्ण चेहऱ्यावर पातळ थर लावा. थोडा वेळ तसंच ठेवून नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

या मास्कचे फायदे काय?
हळदीतील गुणधर्मांमुळे त्वचेवरची लाली आणि सूज कमी होण्यास मदत होते. हा पॅक लावल्यामुळे त्वचा लगेच मऊ, ओलसर आणि चमकदार दिसते. त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, त्वचेला सूट होणारे घटक वापरल्यास फेस पॅकचे चांगले परिणाम मिळतात. हळदीमधील 'करक्युमिन' (Curcumin) नावाचा घटक त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या पेशींशी लढतो आणि त्वचेवर लवकर सुरकुत्या येऊ देत नाही.
हा फेस मास्क वापरण्यापूर्वी घ्यायची काळजी -
तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल किंवा लवकर जळजळ होत असेल, तर काळजी घ्या. हा फेस मास्क चेहऱ्यावर लावण्यापूर्वी हातावर किंवा मानेवर थोडा लावून पॅच टेस्ट करा. जळजळ किंवा खाज वाटल्यास लगेच धुऊन टाका. त्वचेवर जखमा असतील किंवा त्वचा भाजली असेल तर हा पॅक लावू नका.

