सार

Bhaubeej 2023 : दरवर्षी कार्तिक महिन्यात भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. या सणाशी संबंधित एक पौराणिक कथाही जोडलेली आहे. नक्की जाणून घ्या ही कथा…

 

Bhaubeej 2023 : धार्मिक ग्रंथांनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला भाऊबीजेचा सण साजरा केला जातो. यंदा भाऊबीजेचा सण 15 नोव्हेंबर म्हणजे बुधवारी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला भोजनासाठी आमंत्रित करते आणि कपाळावर टिळा लावून त्याच्या सुख-समृद्धीसाठी देवाकडे प्रार्थना करते. 

या सणाशी संबंधित एक पौराणिक कथा देखील जोडली गेली आहे. हा सण साजरा करण्याची परंपरा कशी सुरू झाली? या सणानिमित्त आपण ही कथा नक्कीच जाणून घेतली पाहिजे.

भाऊबीज सणाची कथा (Yamraj-Yamuna Yanchi Katha On Bhaiubeej)

पौराणिक कथेनुसार, यमराज व यमुना यांचा जन्म सूर्यदेवाची पत्नी छाया यांच्यापासून झाला. यानंतर यमराजांनी तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि ते यमलोकाचे अधिपती झाले. दुसरीकडे नदीच्या रूपात यमुना पृथ्वीवर वास्तव्य करू लागली. यमराज व यमुना भाऊ-बहीण असूनही एकमेकांची भेट घेऊ शकत नव्हते.

यमुनेने दिले भाऊ यमराजाला निमंत्रण

पण एके दिवशी यमुनेने भाऊ यमराजाला घर येण्यास निमंत्रण दिले. बहिणीचे आमंत्रण यमराजाने स्वीकारले आणि कार्तिस महिन्याच्या शुक्ल पक्ष द्वितिया तिथिला ते बहिणीच्या घरी पोहोचले. भावाला पाहून यमुनेला खूप आनंद झाला. भाऊ घरी आला म्हणून यमुनेने वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून त्याला खाऊ घातले.

यमराजचे औक्षण करून टिळा लावला

यानंतर यमुनेनं भाऊ यमराजाला टिळा लावून त्याची आरती देखील केली.  बहिणीचे इतके प्रेम पाहून यमराज देखील प्रसन्न झाले. यावेळेस त्यांनी आपल्या बहिणीला वरदान मागण्यास सांगितले. यावर यमुनेने म्हटलं की, ‘जो भाऊ या तिथिला आपल्या बहिणीच्या घरी जाऊन भोजन करेल, त्याचा अकाली मृत्यू होऊ नये. असे वरदान द्या.’

यमराजानेही आनंदाने आपल्या बहिणीला हे वरदान दिले. तेव्हापासून भाऊबीज सण साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे. हा सण भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे- प्रेमाचेही प्रतीक आहे. जे कोणी या दिवशी ही कथा ऐकतात, त्यांना शुभ फळ प्राप्त होते. आजही या तिथिला यमराज आपली बहीण यमुना यांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात, असे मानले जाते.

DISCLAIMER

लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा :

Bhaubeej 2023 : बहिणीने टिळा लावल्यास कसा होतो भावाचा भाग्योदय?

Bhaubeej 2023 : भाऊबीजेला घराच्या प्रवेशद्वारासमोर व पाटाभोवती अशी काढा सुंदर रांगोळी VIDEO

Bhaubeej Wishes 2023: भाऊबीजेला पाठवा या खास शुभेच्छा, भाऊबहिणीचे नाते होईल अधिक मजबूत