Pica Disorder : तुमचं मूल गुपचूप माती, खडू किंवा भिंतीचं प्लास्टर खातं का? याला 'पायका डिसऑर्डर' म्हणतात आणि यामागे आयर्नची (लोहाची) कमतरता हे मुख्य कारण असू शकतं. यावर काय उपाय आहेत, जाणून घेऊया.
Pica Disorder : अनेकदा पालकांच्या नजरेआड मुलं भिंतीचं प्लास्टर, खडू, कागद किंवा माती खातात. जर तुमचं मूलही असं काही करत असेल, तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. इम्रान पटेल यांनी सांगितलं की, मुलांमध्ये आयर्नच्या (लोहाच्या) कमतरतेमुळे 'पायका डिसऑर्डर' (Pica Disorder in Children) नावाची समस्या दिसून येते. पायका ही एक अशी स्थिती आहे, ज्यात मुलं अशा गोष्टी खाऊ लागतात, ज्या खाण्याच्या नसतात. मुलांसोबतच कधीकधी गर्भवती महिला आणि ॲनिमियाने ग्रस्त लोकांमध्येही ही लक्षणं दिसतात. आयर्नच्या कमतरतेमुळे मुलं खालील गोष्टी खाऊ शकतात.

पायका डिसऑर्डरमुळे मुलं या गोष्टी खातात
आयर्नच्या कमतरतेमुळे काही मुलांना या गोष्टी वारंवार खाण्याची किंवा चघळण्याची इच्छा होऊ शकते.
- माती
- खडू
- भिंतीचं प्लास्टर
- विटेचा चुरा
- राख
- कागद
- साबण
- बर्फ (Ice craving)
- वाळू किंवा रेती
असं का होतं?
जेव्हा शरीरात आयर्नची कमतरता असते, तेव्हा त्याचा परिणाम शरीर आणि मेंदूच्या कार्यावर होतो. यामुळे मुलांना काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते. पण मुलं माती किंवा सिमेंटसारख्याच गोष्टी का खातात, याचं नेमकं कारण अजूनही पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही.
पायका डिसऑर्डरमुळे शरीरात ॲनिमियाची लक्षणंही दिसतात. जर तुमचं मूल भिंत चाटत असेल, माती खात असेल किंवा कागद खात असेल, तर अजिबात उशीर न करता बालरोगतज्ज्ञांना भेटा. अशावेळी डॉक्टर सहसा आयर्नची तपासणी करण्याचा सल्ला देतात. तुमच्या मुलामध्येही अशी लक्षणं दिसत असतील, तर तुम्हाला त्याच्या आहारात बदल करण्याची गरज आहे.
आयर्नयुक्त आहाराची निवड करा
डॉ. इम्रान सांगतात की, अशा परिस्थितीत मुलांना आयर्नयुक्त आहार द्यायला हवा. तुम्ही मुलांच्या आहारात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करून आयर्न वाढवू शकता.
- पालक आणि हिरव्या पालेभाज्या
- चणे आणि डाळी
- गूळ
- डाळिंब
- मनुके
- खजूर
- सोयाबीन
- अंडी
- मांस आणि मासे
जर मूल सतत अशा गोष्टी खात असेल, तर ती फक्त एक वाईट सवय आहे असं समजू नका. हे योग्य पोषण मिळत नसल्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. ते वेळीच ओळखून लवकरात लवकर मुलावर उपचार सुरू करा.


