पारंपरिक मराठी संस्कृतीचा अभिमान असलेली पैठणी साडी आज नव्या रूपात पुन्हा लोकप्रिय होत आहे. अगदी जुन्या, वापरात नसलेल्या पैठणी साड्यांचा पुनर्वापर करून आजकल स्टायलिश आणि आकर्षक हँडबॅग्स, क्लचेस आणि स्लिंग बॅग्स तयार केल्या जात आहेत.

“पैठणी” एक अशी पारंपरिक साडी जी प्रत्येक मराठी स्त्रीच्या आयुष्यात खास स्थान राखून आहे. मोर, कमळ, हंस आणि अशाच पारंपरिक नक्षींच्या मोहकतेने सजलेल्या पैठणी साडीला 'साड्यांचा राणी' म्हटले जाते. परंतु कालांतराने काही पैठणी साड्या वापरात राहत नाहीत, त्यांचे रंग फिके पडतात किंवा त्या जुन्या होतात. अशा साड्यांमध्ये असलेली कलाकुसर वाया न जावो म्हणून आता एक नवा ट्रेंड लोकप्रिय होत आहे तो म्हणजे पैठणी साड्यांपासून तयार होणाऱ्या बॅग्स!

आजच्या आधुनिक युगात फॅशन आणि परंपरेचा सुंदर संगम पाहायला मिळतो आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे या बॅग्स. पारंपरिक पैठणी साड्यांतील जरी काम, रंगछटा, नक्षी आणि नाजूक कापड या बॅग्समध्ये अचूकरीत्या वापरले जाते. क्लच, स्लिंग बॅग्स, हँडबॅग्स, पर्सेस अशा विविध प्रकारांमध्ये या बॅग्स उपलब्ध आहेत आणि त्या केवळ सौंदर्यदृष्ट्या उठावदारच नाहीत तर सांस्कृतिकदृष्ट्याही मौल्यवान ठरतात.

या बॅग्स तयार करताना जुन्या, न वापरण्यात येणाऱ्या साड्यांचा उपयोग केला जातो. यामुळे अपसायकलिंगचा संदेश दिला जातो आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोनही जपला जातो. काही महिला उद्योजकांनी याच कल्पनेतून आपली व्यवसायिक वाटचाल सुरू केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून या बॅग्सना देशभरच नव्हे तर परदेशातही मागणी वाढली आहे. अनेक मराठी महिलांनी या बॅग्सचा वापर सण, कार्यक्रम, लग्नसमारंभ, naming ceremony अशा खास प्रसंगी करण्यास सुरुवात केली आहे.

या बॅग्समधील खासियत म्हणजे त्या प्रत्येक बॅगची रचना आणि रंगसंगती वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक बॅग युनिक दिसते. पैठणीच्या लाल, जांभळ्या, हिरव्या, निळ्या रंगांमध्ये असलेल्या डिझाइन्स एखाद्या बॅगवर इतक्या उठून दिसतात की पाहणाऱ्याचे लक्ष नक्कीच वेधून घेतात. अनेक सेलिब्रिटी महिला, डिझायनर्सही आता अशा बॅग्स परिधान करताना दिसत आहेत.

पैठणी बॅग्समधून केवळ फॅशन नव्हे तर एक प्रकारची संस्कृती, वारसा आणि कौटुंबिक भावना जपली जाते. आईने वापरलेली जुनी पैठणी साडी मुलीने तिच्या बॅगमध्ये जपणे हे फक्त वस्तूचा वापर नाही, तर त्या भावनांचा आदर आहे. यामुळे पैठणी साडी आता केवळ कपाटात राहात नाही, तर नव्या रूपात नव्या पिढीपर्यंत पोहोचते.

एकंदरीत, पैठणी बॅग्स म्हणजे परंपरेला फॅशनचा नवा टच देणारा एक अनोखा प्रवास आहे. यामुळे मराठी संस्कृतीचे वैभव जागतिक पातळीवर पोहोचण्यास मदत होते आणि महिला सशक्तीकरणासाठीही एक चांगला पर्याय निर्माण होतो. अशा कल्पक आणि कलात्मक उपक्रमांना निश्चितच प्रोत्साहन मिळायला हवे.