OnePlus India Shutdown : भारतात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे OnePlus स्मार्टफोन बंद होणार असल्याची बातमी एका टेक मीडियाने दिली होती. यानंतर OnePlus इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.
OnePlus India Shutdown : चीनी स्मार्टफोन निर्माता OnePlus भारतातील आपले कामकाज बंद करून मूळ कंपनी Oppo मध्ये विलीन होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून पसरत आहेत. केवळ सोशल मीडियावरच नाही, तर अनेक टेक माध्यमांनीही OnePlus भारत सोडणार असल्याची बातमी दिली होती. मात्र, आता OnePlus इंडियाचे सीईओ रॉबिन लियू यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. OnePlus भारतातील कामकाज बंद करणार असल्याची चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे रॉबिन लियू यांनी X प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे. कंपनी बंद करण्याबाबतचे हे दावे पूर्णपणे खोटे असून, OnePlus भारतात सेवा देत राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी OnePlus चे निवेदनही X वर शेअर केले आहे.
अफवांची सुरुवात अशी झाली
OnePlus बंद होण्याच्या चर्चांना प्रामुख्याने अँड्रॉइड हेडलाइन्सच्या रिपोर्टमुळे वेग आला. अँड्रॉइड मोबाईलशी संबंधित बातम्या देण्यासाठी अँड्रॉइड हेडलाइन्स प्रसिद्ध आहे. भारतात येणारे अनेक OnePlus प्रोजेक्ट्स कंपनीने थांबवले असल्याचा दावा अँड्रॉइड हेडलाइन्सने केला आहे. मूळ कंपनी Oppo आता OnePlus ला स्वतंत्र ब्रँड म्हणून चालवण्याऐवजी एक सब-सिरीज बनवण्याचा विचार करत असल्याचेही रिपोर्टमध्ये म्हटले आहे. मागील वर्षी दक्षिण भारतातील विक्रेत्यांसोबत मार्जिनवरून झालेला वाद हे देखील OnePlus भारत सोडण्याच्या चर्चांमागील एक कारण मानले जात आहे.
भविष्यासाठी मोठी तयारी
दरम्यान, OnePlus इंडियाच्या कामकाजाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीमागील सत्य स्पष्ट करू इच्छितो, असे सीईओ रॉबिन लियू यांनी निवेदनात म्हटले आहे. भारतातील OnePlus कंपनीचे कामकाज पूर्णपणे सामान्य असून, आम्ही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे रॉबिन लियू यांनी स्पष्ट केले. OnePlus सध्या आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनवर (OnePlus 16 सिरीज) काम करत असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. यामध्ये 9,000 mAh बॅटरी आणि अत्याधुनिक डिस्प्ले तंत्रज्ञान असण्याची शक्यता आहे.


