Oldest River : हिमालयापेक्षा जुनी नदी, भारताची सर्वांत प्राचीन नदी कोणती?
Oldest River: आपल्या देशात अनेक नद्या आहेत. पण हिमालयापेक्षाही आधी अस्तित्वात आलेली एक नदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? कोट्यवधी वर्षांपूर्वी तयार झालेल्या या नदीचे वैशिष्ट्य काय आहे ते जाणून घेऊया.

डायनासोरच्या काळातील नदी
भारतातील सर्वांत पवित्र आणि प्राचीन नदी म्हटल्यावर आपल्याला आधी गंगा नदी आठवते. पण गंगा आणि यमुनेपेक्षाही एक जुनी नदी आहे. ती कोणती? डायनासोरच्या काळापासून, हिमालयाच्याही आधीपासून असलेली ही प्राचीन नदी कोणती ते पाहूया...
गंगा नदी ५ कोटी वर्षे जुनी आहे, तर नर्मदा नदी १६ कोटी वर्षांपूर्वी आपल्या भूभागावर उगम पावली. गंगेपेक्षा ही नदी तिप्पट जुनी आहे. विशेष म्हणजे हिमालयाच्या निर्मितीपूर्वीच ही नदी तयार झाली.

ही नदी कशी तयार झाली?
भौगोलिक हालचालींमुळे दोन डोंगरांमधील जमीन खचून तयार झालेल्या दरीतून नर्मदा नदी वाहते. इतर सर्व नद्या पूर्वेकडे वाहतात, पण ही नदी पश्चिमेकडे वाहते. मोठ्या नद्या समुद्राला मिळण्यापूर्वी डेल्टा तयार करतात, पण नर्मदा थेट 'खंभातच्या आखाता'तून अरबी समुद्राला मिळते.
मध्य प्रदेशातील अमरकंटक पठारावर उगम पावणारी नर्मदा, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यांमधून सुमारे १,३१२ किलोमीटरचा प्रवास करून गुजरातमधील भरुच येथे समुद्राला मिळते. पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्यांमध्ये ही सर्वांत मोठी, तर देशातील पाचवी सर्वांत मोठी नदी आहे.
डायनासोरच्या काळातील नदी
तिथे सापडलेले ऐतिहासिक पुरावे ही नदी सर्वांत प्राचीन असल्याचे सिद्ध करतात. १८२८ मध्ये विल्यम स्लीमन या अधिकाऱ्याने जबलपूरजवळ भारतातील पहिला डायनासोरचा जीवाश्म शोधला. १९८२ मध्ये 'राजासॉरस नर्मदेन्सिस' या डायनासोरचे जीवाश्म इथेच सापडले. या नर्मदा नदीतच सर्वांत प्राचीन मानवी जीवाश्मही मिळाला. म्हणूनच ही नदी सर्वांत प्राचीन मानली जाते.
पूजनीय नदी
भौगोलिकदृष्ट्याच नव्हे, तर हिंदू परंपरेतही नर्मदेला विशेष स्थान आहे. तिला साक्षात देवी मानले जाते, पुराणात तिला 'रेवा' असेही म्हणतात. आदि शंकराचार्य त्यांच्या गुरूंना इथेच भेटले, असे मानले जाते.

