अनेकांना वाटतं की साखरेऐवजी गूळ खाल्ल्याने वजन कमी होतं. पण तज्ज्ञांच्या मते, गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं, अगदी पांढऱ्या साखरेसारखंच.

मुंबई : चहाप्रेमींची संख्या काही कमी नाही. पण त्यातही काहीजण असे आहेत जे चहामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करतात. त्यांना वाटतं की असं केल्याने वजन कमी होतं. पण खरंच साखरेऐवजी गूळ वापरणं इतकं फायदेशीर आहे का?

'इंटरनॅशनल जर्नल ऑफ अप्लाइड होम सायन्स'नुसार, पांढऱ्या साखरेच्या तुलनेत गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि खनिजं (Minerals) जास्त असतात. पांढरी साखर रक्तातली साखर अचानक वाढवते आणि शरीरात फॅट्स जमा होण्यास कारणीभूत ठरू शकते. पण तज्ज्ञ सांगतात की, गूळ आरोग्यदायी असला तरी, साखर आणि गूळ दोन्हीमुळे शरीरातील कॅलरीज वाढतात.

गूळ हा एक गोड पदार्थ आहे, त्यामुळे फक्त गूळ खाऊन वजन कमी होत नाही. पांढऱ्या साखरेचं व्यसन लागू शकतं आणि त्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीत अचानक चढ-उतार होऊ शकतात. याउलट, गूळ हा एक चांगला पर्याय असल्याचं अनेक अभ्यासांमधून समोर येत आहे.

आता कॅलरीजचं गणित पाहूया - 

१०० ग्रॅम गुळामध्ये ३८३ कॅलरीज असतात, तर १०० ग्रॅम पांढऱ्या साखरेत ३८७ कॅलरीज असतात. म्हणजे कॅलरीजमध्ये फारसा फरक नाही. पण त्यांच्यातील पोषक तत्वांच्या रचनेमुळे शरीरावर होणारा परिणाम मात्र वेगवेगळा असतो.

गूळ खाल्ल्याने वजन कमी होतं, हे सिद्ध करणारा कोणताही थेट क्लिनिकल पुरावा नाही. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास आणि शरीराला पोषक तत्वं देण्यास गुळाची मदत होते, हे खरं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, गूळ जास्त प्रमाणात खाल्ल्यास तुमचं वजन वाढू शकतं. पांढऱ्या साखरेच्या बाबतीतही अगदी हेच घडतं, असं तज्ज्ञ सांगतात.