International Day of Forests 2024: वृक्ष सन्मानाचा दिवस ,वृक्ष आपल्याला सगळं देतात आपण त्यांना काय देतो ?

| Published : Mar 21 2024, 08:00 AM IST

International Day of Forests 2024

सार

वृक्ष हा जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा मानवी कल्याणासाठी असणारा उपयोग, जंगलावर अवलंबून औषध प्रणाली त्याचबरोबर त्यावरील जैवविविधता याचे ज्ञान सगळ्यांना मिळावे उद्देशामधून संयुक्तराष्ट्र संघाने 21 मार्च हा दिवस "जागतिक वन दिन" साजरा केला जातो. 

"वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे" याप्रमाणे वृक्ष आपल्याला शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी खूप काही देतात. जंगलातील घनदाट झाडे हवा प्रदूषणापासून मुक्त करतात, हवामान बदलाशी लढण्यासाठी आवश्यक कार्बन डायऑक्साइड साठवतात आणि औषधेही देतात. मात्र वृक्ष आपल्याला सगळं देतो पण आम्ही त्यांना काहीही देत ​​नाही. सध्या बदलते हवामान जगभर अत्यंत कळीचा मुद्दा झाला असून यावर सर्वच स्तरातून काम सुरु. तर दुसरीकडे मानवाकडूनच विकासाच्या नावाने जंगले झाडे सर्रास तोडली जाताय मग नेमकं जबाबदार कोण ? असा देखील प्रश्न अनेकांना पडतो. पण अश्या परिस्थितीत प्रत्येकाने वृक्षांचे जंगलांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.

आंतरराष्ट्रीय वन दिवस प्रतिवर्षी 21 मार्चला साजरा होतो. वृक्ष हा जंगलाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा मानवी कल्याणासाठी असणारा उपयोग, जंगलावर अवलंबून असणारी प्राचीन औषध प्रणाली त्याचबरोबर आदिम जमातीची त्यावरील उपजीविकता आणि जैवविविधता याचे ज्ञान सगळ्यांना मिळावे या उद्देशामधून संयुक्त राष्ट्र संघाने 2012 पासून 21 मार्च हा दिवस "जागतिक वन दिन" म्हणून पृथ्वीवरील सर्व लहान-मोठय़ा सदस्य राष्ट्रांना तळागाळापर्यंत जाऊन साजरा करण्याचे सुचविले आणि प्रत्यक्षामध्ये आणलेसुद्धा. जागतिक वन दिन साजरा करण्यामध्ये जागतिक अन्न आणि कृषी संघटनेचासुद्धा मोलाचा वाटा आहे. प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रातर्फे वन दिवसासाठी एक घोषवाक्य जाहीर केले जाते आणि नंतर वर्षभर त्या घोषवाक्यावर कृतिशील कार्य करून जगभरात वन संवर्धनाच्या शिक्षणाचे कार्य केले जाते.दिलेल्या वाक्यानुसार कार्याचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी, अडचणी समजून पुढील वर्षांत त्या सोडवण्यावर भर दिला जातो. या वर्षीच्या 21 मार्च 2024 या जागतिक वन दिवसाचे घोषवाक्य 'फॉरेस्ट आणि इनोव्हेशन: चांगल्या समाजासाठी नवीन उपाय' असून या वर वर्ष भर काम केले जाणार आहे.

21 मार्च हा जागतिक वन दिवस लोकसहभागामधून साजरा व्हावा, यामध्ये शाळा, महाविद्यालयामधील युवकांचा सहभाग वाढावा, या दिवशी मोठय़ा प्रमाणावर मोकळया, सुरक्षित आणि वृक्षासाठी योग्य अशा जागेवर सामूहिक वृक्षारोपण करावे ही अपेक्षा असते पण त्याचबरोबर वृक्षारोपण हे फक्त समाजसेवा म्हणून न करता त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणेही आवश्यक असावे. 21 मार्च हा वन दिन असला तरी तो वृक्ष सन्मानाचा दिवस आहे याचा विसर पडता कामा नये.

आंतरराष्ट्रीय वन दिवस साजरा करण्यामागचा उद्देश:

  •  वृक्षांच्या मूल्याबाबत जनजागृती करणे.
  •  हवामान बदलाचे परिणाम आणि मानवनिर्मित प्रदूषणामुळे, ओझोनचे प्रमाण धोकादायकपणे खालच्या पातळीवर गेले आहे.
  • हवामान बदलाचे व्यवस्थापन.
  • पर्यावरणीय समतोल राखणे. 
  • विविध प्रकारच्या प्राण्यांना अधिवास देणे आणि जगभरातील लाखो लोकांचे जीवनमान टिकवून ठेवणे हे सर्व वनांमुळे शक्य होईल.