- Home
- lifestyle
- Inspirational Story : बटाटा, अंडी आणि कॉफी बिन्स उलगडतील आयुष्यातील समिकरणे, संकटे होतील दूर!
Inspirational Story : बटाटा, अंडी आणि कॉफी बिन्स उलगडतील आयुष्यातील समिकरणे, संकटे होतील दूर!
Inspirational Story : प्रत्येकाच्या आयुष्यात संकटं येतात. पण आपण त्या संकटांना कसं सामोरं जातो, यावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं. असाच एक महत्त्वाचा संदेश देणारी ही गोष्ट आता आपण जाणून घेऊया.

एका मुलीचं दुःख
एके दिवशी एक मुलगी तिच्या वडिलांशी बोलत होती, “बाबा, माझं आयुष्य खूप कठीण झालं आहे. सतत अडचणी येत आहेत. एक अडचण सोडवली की लगेच दुसरी समोर येते. आता पुढे कसं जगायचं हेच मला कळत नाहीये...” असं ती रडवेल्या स्वरात म्हणाली.
वडिलांनी केलेला प्रयोग
तिचे वडील एक शेफ होते. ते काहीही न बोलता तिला स्वयंपाकघरात घेऊन गेले. त्यांनी तीन भांड्यांमध्ये पाणी भरून गॅसवर ठेवलं. पाणी उकळल्यानंतर त्यांनी एका भांड्यात बटाटे, दुसऱ्या भांड्यात अंडी आणि तिसऱ्या भांड्यात कॉफी बीन्स टाकल्या. एकही शब्द न बोलता त्यांनी त्या गोष्टी २० मिनिटं उकळू दिल्या.
वडिलांनी दाखवला परिणाम
त्यानंतर त्यांनी भांडी उतरवली आणि बटाटे एका वाटीत, अंडी दुसऱ्या वाटीत काढली. कॉफी एका कपात ओतली. “तुला काय दिसतंय?” त्यांनी विचारलं. ती म्हणाली, “बटाटे, अंडी आणि कॉफी.” वडील म्हणाले, “जरा जवळून बघ.” तिने बटाट्यांना हात लावला, तेव्हा ते मऊ झाल्याचं तिच्या लक्षात आलं. अंडं फोडल्यावर ते आतून कडक शिजल्याचं तिला समजलं. त्याचप्रमाणे, कॉफी बीन्सचा सुगंधित कॉफीमध्ये बदल झाल्याचं पाहून ती हसली.
आयुष्याचा धडा
तेव्हा वडिलांनी तिला समजावलं, “या तिन्ही गोष्टींना उकळत्या पाण्यात एकाच संकटाचा सामना करावा लागला. पण प्रत्येकाने वेगवेगळी प्रतिक्रिया दिली.
* बटाटा आधी कडक आणि मजबूत होता, पण पाण्यात उकळल्यावर तो मऊ आणि कमकुवत झाला.
* अंडं बाहेरून नाजूक आणि आतून द्रवरूप होतं, पण पाण्यात उकळल्यावर ते आतून कडक झालं.
* कॉफी बीन्स पाण्यात उकळल्या, तेव्हा त्यांनी पाण्यालाच बदलून टाकलं आणि एक नवीन सुगंध व चव तयार केली.”
तुझा निर्णय काय आहे?
हे सगळं दाखवल्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, “जेव्हा संकटं येतात, तेव्हा तू कशी प्रतिक्रिया देतेस?
* बटाट्यासारखी कमकुवत होतेस?
* अंड्यासारखी कडक बनतेस? की कॉफीसारखी परिस्थितीच बदलून टाकतेस?”
या गोष्टीचं तात्पर्य: आपल्या आयुष्यात, आपल्यासोबत किंवा आजूबाजूला काय घडतं यापेक्षा, आपल्या आत काय घडतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण संकटांना कसं सामोरं जातो, यावरच आपलं आयुष्य अवलंबून असतं, हाच या कथेचा संदेश आहे.

