कॉर्पोरेट नोकरीला रामराम ठोकून कंटेंट क्रिएशनमध्ये उतरलेल्या अॅलेक्स पेट्राकीव्हा नावाच्या तरुणीची ही गोष्ट आहे. तिने फक्त अडीच वर्षांत तब्बल 8.35 कोटी रुपये कमावले आहेत. आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट युट्यूब आणि इतर सोशल मीडियावर शेअर करून तिने हे यश मिळवलं. आता नवराही तिच्या या व्यवसायात सामील झाला आहे.
सोशल मीडियावर आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण आणि अनुभव शेअर करून एका तरुणीने कोट्यवधी रुपये कमावले आहेत. तिची ही सक्सेस स्टोरी सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. कॉर्पोरेटमधली चांगली नोकरी सोडून तिने कंटेंट क्रिएशनचं काम सुरू केलं आणि फक्त अडीच वर्षांत तब्बल 8.35 कोटी रुपये (एक मिलियन डॉलर्स) कमावले, तेही युट्यूब लाईव्हमधून.
आधी छंद, मग तेच बनलं काम
2023 मध्ये, अॅलेक्स पेट्राकीव्हा बल्गेरियातून अमेरिकेत कॉर्पोरेट नोकरीसाठी आली. पण काही काळातच तिला त्या कामाचा कंटाळा आला. म्हणून तिने नोकरीसोबत छंद म्हणून टिकटॉकवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. 2024 मध्ये ती प्रत्येक ब्रँड प्रमोशनसाठी 600 डॉलर्स घेऊ लागली. नंतर तिने या छंदालाच पूर्णवेळ व्यवसायात बदललं. 2024 च्या अखेरपर्यंत अॅलेक्सने फक्त व्हिडिओंच्या कमाईतून 1,20,000 डॉलर्स कमावले होते. आपलं रोजचं आयुष्य, काम, कुटुंब, प्रवास आणि आर्थिक गोष्टींसारखे अनेक अनुभव ती सोशल मीडियावर फॉलोअर्ससोबत शेअर करत होती. यामुळे तिचे फॉलोअर्स खूप वाढले आणि तिला वेगवेगळ्या ब्रँड्ससोबत काम करण्याची संधी मिळाली.
आज, नवराही सोबत
डिजिटल प्लॅटफॉर्मवरून मिळणारी कमाई स्थिर झाल्यावर आपण कॉर्पोरेट नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला, असं अॅलेक्सने सांगितलं. त्यानंतर तिने कंटेंट निर्मिती अधिक व्यावसायिक पद्धतीने करण्यासाठी स्वतःची टीम तयार केली. याचाच एक भाग म्हणून तिच्या नवऱ्यानेही आपली नोकरी सोडून या व्यवसायात तिला साथ दिली, असंही अॅलेक्स सांगते. दोघांनी मिळून आपल्या या नव्या व्यवसायात 5 लाख डॉलर्सची गुंतवणूक केली. सध्या शूटिंग, एडिटिंग, ब्रँडसोबतचं काम आणि व्यवसायाची इतर कामं दोघे मिळून सांभाळतात.
दर्जेदार कंटेंट
आपल्या यशामागे एकच व्हायरल व्हिडिओ नाही, तर दीर्घकाळ सातत्याने दर्जेदार कंटेंट तयार करणं हे महत्त्वाचं कारण असल्याचं तिने सांगितलं. प्रेक्षकांसोबत विश्वासाचं नातं तयार करणं आणि आयुष्यातील खरे अनुभव मोकळेपणाने मांडणं यामुळेच आपली वाढ झाली, असं तिचं मत आहे. सोशल मीडियाला फक्त मनोरंजनाचं साधन न मानता त्यातून व्यवसाय आणि कमाईचा मार्ग कसा तयार करता येतो, याचं अॅलेक्स पेट्राकीव्हाचा अनुभव एक उत्तम उदाहरण मानलं जात आहे. तिच्या या यशाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.


