Hotel Room Safety : हॉटेलमध्ये राहताय? रूममध्ये जाताच सर्वात आधी 'हे' काम करा!
सुट्टीत हॉटेलमध्ये राहताय? रूममध्ये सुरक्षित राहायचं असेल, तर आत पाऊल ठेवताच काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्की तपासल्या पाहिजेत.

हॉटेलमध्ये राहताय?
प्रवासाची आवड सर्वांनाच असते. दिवसभर फिरून आल्यावर हॉटेलच्या रूममध्ये शांतपणे आराम करावा, असं प्रत्येकाला वाटतं. पण, तुम्ही बुक केलेली हॉटेलची रूम खरंच सुरक्षित आहे का? आजकाल तंत्रज्ञान वाढल्याने हॉटेलच्या रूममध्ये छुपे कॅमेरे बसवणे आणि असुरक्षित वाय-फायद्वारे डेटा चोरणे, असे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ट्रिप एन्जॉय करण्यापूर्वी तुम्ही स्वतः तुमच्या रूमची सुरक्षा कशी तपासू शकता, हे आपण या सोप्या टिप्समधून जाणून घेऊया.

छुपे कॅमेरे असे शोधा..
रूममध्ये गेल्यावर प्रायव्हसीला धोका निर्माण करणारे छुपे कॅमेरे आहेत की नाही, हे तुम्ही सर्वात आधी तपासले पाहिजे. विशेषतः बेडसमोरील टीव्ही, स्मोक डिटेक्टर्स, भिंतीवरील घड्याळ, आरसे आणि बाथरूममधील शॉवर हेडजवळ एखादा छोटा लेन्स आहे का, हे नीट तपासा.
फ्लॅशलाईट ट्रिक वापरा:
रूममधील सर्व लाईट्स बंद करा आणि तुमच्या फोनचा फ्लॅशलाईट चालू करून प्रत्येक कोपरा तपासा. कुठेही कॅमेऱ्याचा लेन्स असेल, तर तो लाईटमुळे चमकेल. तुम्ही बाजारात मिळणारे अँटी-स्पाय डिटेक्टर ॲप्स किंवा कॅमेरा डिटेक्टर्स वापरूनही छुप्या कॅमेऱ्यांचे सिग्नल्स शोधू शकता.
'टू-वे मिरर' टेस्ट करा:
रूममधील आरसा खरा आहे की पलीकडून कोणीतरी तुम्हाला पाहत आहे, हे ओळखण्यासाठी तुम्ही एक छोटी टेस्ट करू शकता. तुमच्या हाताचे बोट आरशावर ठेवा. जर तुमचे बोट आणि आरशातील प्रतिबिंब यांच्यात थोडी जागा (गॅप) दिसत असेल, तर तो सामान्य आरसा आहे. पण, जर कोणतीही जागा न दिसता बोट थेट आरशाला चिकटल्यासारखे वाटले, तर तो 'टू-वे मिरर' असू शकतो. अशा वेळी तुम्ही सावध राहायला हवे.
हॉटेलचे वाय-फाय वापरताना सुरक्षा महत्त्वाची
हॉटेल्समध्ये मिळणारे पब्लिक वाय-फाय नेटवर्क बहुतांश वेळा सुरक्षित नसतात. हॅकर्स अशा नेटवर्कला सहज टार्गेट करू शकतात. त्यामुळे हॉटेलचे वाय-फाय कनेक्ट केल्यावर तुम्ही ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार किंवा वैयक्तिक पासवर्ड टाईप करणे टाळले पाहिजे. शक्य असल्यास तुम्ही तुमचा मोबाईल डेटाच वापरा.
डोअर लॉक आणि सिक्युरिटी चेन तपासा:
तुम्ही झोपण्यापूर्वी किंवा रूममध्ये असताना दरवाजाचे लॉक आणि सिक्युरिटी चेन नीट काम करत आहे की नाही, हे तपासून पाहा. डोअर मॉनिटर किंवा आय-होलवर काही कव्हर किंवा डॅमेज आहे का, हेही तपासा.
इमर्जन्सी एक्झिट्स शोधा:
हॉटेलमध्ये पाऊल ठेवताच आग किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास बाहेर पडण्याचे मार्ग (इमर्जन्सी एक्झिट) कुठे आहेत, हे तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या. यामुळे तुम्ही संभाव्य धोक्यांपासून स्वतःचा बचाव करू शकता.
