Health: जेवल्यानंतरही लगेच भूक लागते का? कोणती आहेत कारणे... जाणून घेऊयात
Health: सणासमारंभाच्या किंवा सध्या सुरू असणाऱ्या लग्नसमारंभांमध्ये भरपेट खाणं ही एक सामान्य समस्या असल्याचे बघायला मिळते. मेन्यू आवडीचा होता म्हणून कितीही खाल्लं तरी पुन्हा पुन्हा भूक लागण्यामागे काय कारणं आहेत, हे या लेखात जाणून घेऊया.

जेवल्यानंतरही भूक
काही लोकांना कितीही खाल्ले तरी थोड्याच वेळात पुन्हा भूक लागायला सुरुवात होते. याकडे सामान्य भूक म्हणून दुर्लक्ष करू नका. कारण, अशाप्रकारे भूक लागण्यामागे काही गंभीर आरोग्य समस्या देखील असू शकतात.त्या कोणत्या याबद्दल येथे सविस्तर जाणून घेऊया.
मधुमेह:
जास्त भूक लागण्यामागे मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे. आपण खाल्लेल्या अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. हे ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचण्यासाठी इन्सुलिनची गरज असते. मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलिन योग्यरित्या काम करत नसल्यास, पेशींना ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे, ऊर्जेसाठी शरीर सतत अन्नासाठी संकेत पाठवत राहते. यामुळेच कितीही खाल्ले तरी पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होते.
थायरॉईड समस्या:
जेव्हा थायरॉईड ग्रंथी जास्त सक्रिय होते, तेव्हा शरीराचा मेटाबॉलिझम रेट वाढतो. यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात. त्यामुळे, कितीही अन्न खाल्ले तरी शरीर ते लगेच वापरते आणि पुन्हा पुन्हा भूक लागते. काहींना जास्त भूक लागण्यासोबतच वजन कमी होण्याची समस्याही जाणवू शकते. हृदयाचे ठोके वाढणे, अशक्तपणा, थकवा अशी लक्षणे दिसल्यास थायरॉईडची तपासणी करून घ्या.
झोपेची कमतरता
तणावामुळे झोपेवर परिणाम होतो. एखाद्या व्यक्तीला तीव्र तणाव असल्यास, त्याच्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात स्रवतो. यामुळे तुमची भूक सतत वाढत राहते. रात्री पुरेशी झोप न घेणाऱ्यांमध्ये भूक वाढवणारे हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतात. यामुळे भूक कमी करणारा लेप्टिन हार्मोन कमी स्रवतो आणि जास्त भूक लागते.
डिहायड्रेशन
आपला मेंदू तहान लागल्यास चुकीने भुकेचे संकेत पाठवतो, ज्यामुळे आपण जास्त खातो. पण शरीरातील पाण्याची कमतरता ओळखून पाणी प्यायला हवे. प्रत्येक भुकेवर अन्न हा उपाय नाही, कधीकधी एक ग्लास पाणी पुरेसे असते.
वर सांगितलेल्या समस्या दूर करण्यासाठी तुमचा आहार आरोग्यदायी करणे आवश्यक आहे. प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थ दररोज किमान 35 ग्रॅम खाणे शरीरासाठी आवश्यक आहे. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. वर नमूद केलेल्या समस्या गंभीर असल्यास किंवा सुरुवातीची लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

