Dates Health Benefits : फक्त 2 खजूर 2 महिने खाऊन बघा... शरीरात दिसेल बदल
रोज सकाळी फक्त २ खजूर खाण्याची सवय तुमच्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे देऊ शकते. खजुरात असलेलं फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह तुमच्या आरोग्यासाठी कसे फायदेशीर ठरतात?

रोज २ खजूर.. २ महिन्यात दिसेल बदल
खजूर हे अत्यंत पौष्टिक फळ आहे. याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. शरीरातील ऊर्जा आणि ताकद वाढवण्याबद्दल बोलताना, नेहमी खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो. पण, फक्त २ महिने रोज २ खजूर खाल्ले तर तुमच्या शरीरात काय बदल होतील हे तुम्हाला माहिती आहे का? खजुराचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो, हे तज्ज्ञांनी इथे स्पष्ट केलं आहे.

खजुरातील कार्बोहायड्रेट्स
खजुरामध्ये नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असतं. म्हणजेच कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स पोटात खूप लवकर पचतात आणि रक्तात मिसळतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. सुमारे ३ ते ४ खजुरांमध्ये, म्हणजेच ४० ग्रॅम खजुरांमध्ये ३० ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. याव्यतिरिक्त, त्यात ३.२ ग्रॅम फायबर आणि ०.९८ ग्रॅम प्रथिनेही असतात. एवढे खजूर खाल्ल्याने तुम्हाला काही मिनिटांत ११३ कॅलरीज ऊर्जा मिळते. या सर्वांसोबतच खजुरात पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह आणि अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात.
रोज २ खजूर खाल्ल्यावर काय होतं?
सलग दोन महिने रोज सकाळी दोन खजूर खाण्याची सवय लावली तर तुम्हाला शरीरात अनेक बदल दिसून येतील. खजुरात भरपूर फायबर असतं. हे पचन सुधारण्यास मदत करतं. यामुळे पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
शरीराला सतत ऊर्जा देते
खजुरात असलेल्या कार्बोहायड्रेट्समध्ये फ्रक्टोज आणि ग्लुकोजचा समावेश असतो. हे शरीराला सकाळी सतत ऊर्जा पुरवतात. सकाळी बाजारात मिळणारे काही पदार्थ खाल्ल्यास तुमची ऊर्जा पातळी कमी होऊ शकते आणि दिवसभर तुम्हाला थकवा जाणवू शकतो. पण, खजूर खाल्ल्याने शरीराला सतत ऊर्जा मिळते.
२ खजूर खाण्याचे फायदे
- खजुरात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतं. ही खनिजे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे ठोके निरोगी ठेवण्यास मदत करतात.
- नियमितपणे खजूर खाल्ल्याने एलडीएल (खराब कोलेस्ट्रॉल) ची पातळी कमी होऊ शकते असं काही अभ्यासातून समोर आलं आहे.
- तसेच खजुरांमध्ये फ्लॅव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पेशींमधील जळजळ कमी करण्यास मदत करतात.
- सलग दोन महिने रोज दोन खजूर खाल्ल्यास तुमचे आतडे मजबूत होतील आणि तुम्हाला त्याचे फायदे नक्कीच जाणवतील. पचनाची कोणतीही समस्या राहणार नाही. पोट फुगणार नाही आणि सकाळी पोट सहज साफ होईल.
- खजुरांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह देखील असतं, जे ॲनिमिया (रक्तक्षय) टाळण्यास मदत करतं.
गर्भवती महिलांसाठी खजूर खाण्याचे खास फायदे
'रिसर्च रिव्ह्यू अँड अॅनालिसिस २०२४' या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, खजूर खाणं महिलांसाठी विशेषतः फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. विशेषतः गर्भवती महिलांना याचा खूप फायदा होतो. या अभ्यासात १२० महिलांना त्यांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या ४ ते ६ आठवड्यांत दररोज ६ खजूर देण्यात आले. या महिलांमध्ये गर्भाशयाचं मुख वेगाने उघडत असल्याचं दिसून आलं. हे कसं घडलं याचा अभ्यास केल्यावर संशोधकांना असं आढळलं की खजुरात असलेल्या फॅटी ॲसिड्समुळे महिलांच्या शरीरात प्रोस्टाग्लॅंडिनचं प्रमाण वाढलं. हे एक प्रकारचं फॅटी कंपाऊंड आहे जे गर्भाशय आकुंचन पावण्यास मदत करतं. यामुळे नैसर्गिक प्रसूती सोपी होते, असं या अभ्यासात म्हटलं आहे.
