घरी बाग नाहीये? तरीही तुम्ही ताजी कोथिंबीर उगवू शकता. फक्त एक कुंडी, चांगला सूर्यप्रकाश आणि योग्य पाणी वापरून तुम्ही घरच्या घरी कोथिंबीर कशी लावू शकता, हे जाणून घ्या.

घरी ताजी कोथिंबीर लावणं तुम्हाला वाटतंय तितकं अवघड नाहीये. हिरवीगार कोथिंबीर लावण्यासाठी मोठी बाग किंवा टेरेस पाहिजे असं काही नाही. एक छोटी कुंडी, एखादा डबा किंवा खिडकीजवळ ठेवलेली कोणतीही वस्तू पुरेशी आहे. फक्त त्याला चांगला सूर्यप्रकाश मिळायला हवा.

योग्य कुंडी निवडा

कोथिंबीर लावण्यासाठी किमान 6 ते 8 इंच खोल आणि खाली छिद्रं असलेली कुंडी निवडा. कोथिंबिरीची मुळं फार खोल जात नाहीत, त्यामुळे जर तुम्हाला एकाच वेळी जास्त रोपं लावायची असतील, तर पसरट कुंडी जास्त चांगली ठरते.

चांगल्या प्रतीची माती वापरा

कोथिंबीर भुसभुशीत आणि पाणी सहज निचरा होणाऱ्या मातीत चांगली वाढते. साध्या मातीत कंपोस्ट खत किंवा गांडूळ खत मिसळा. यामुळे मातीचा कस वाढतो आणि पाण्याचा निचराही चांगला होतो. घट्ट किंवा चिकणमाती वापरू नका, कारण त्यात पाणी साचून मुळं खराब होऊ शकतात.

ताज्या बियांचा वापर करा

चांगल्या रिझल्टसाठी चांगल्या प्रतीचे धणे वापरा. पेरणी करण्यापूर्वी अख्खे धणे हलकेसे फोडून त्याचे दोन भाग करा, पण त्याची पावडर करू नका. यामुळे बियांना मोड लवकर येतात.

बिया योग्य पद्धतीने पेरा

कुंडीतल्या मातीवर बिया सारख्या प्रमाणात पसरा आणि त्यावर मातीचा पातळ थर टाका. बिया जास्त खोलवर पेरू नका. बिया पेरून झाल्यावर भांड्याला हलकंसं पाणी द्या. माती फक्त ओलसर झाली पाहिजे, चिखल होता कामा नये.

पुरेसा सूर्यप्रकाश द्या

कुंडी अशा ठिकाणी ठेवा जिथे रोपाला दिवसातून किमान 4 ते 6 तास सूर्यप्रकाश मिळेल. यासाठी सनी बाल्कनी, खिडकी किंवा भरपूर उजेड येणारी जागा उत्तम आहे.

पाणी जपून घाला

कोथिंबिरीला सतत ओलसर मातीची गरज असते, विशेषतः जेव्हा बियांना अंकुर फुटत असतात. जेव्हा मातीचा वरचा थर कोरडा वाटू लागेल, तेव्हाच हलक्या हाताने पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळं सडू शकतात, त्यामुळे जास्तीचं पाणी कुंडीतून बाहेर जाईल याची खात्री करा.

एकदा रोपांना पुरेशी पानं आली की तुम्ही ताजी कोथिंबीर तोडू शकता. संपूर्ण रोप उपटण्याऐवजी, बाहेरची देठं आणि पानं कापून घ्या. यामुळे उरलेलं रोप वाढत राहतं.

सतत पुरवठ्यासाठी पेरणी करत रहा

जर तुम्हाला नियमितपणे ताजी कोथिंबीर हवी असेल, तर दर दोन आठवड्यांनी थोड्या-थोड्या बिया पेरत रहा. या पद्धतीमुळे तुमच्याकडे नेहमीच काढणीसाठी तयार असलेली कोथिंबिरीची रोपं असतील.

शेवटची टीप

ताजी कोथिंबीर उगवण्यासाठी तुम्हाला मोठ्या परसबागेची गरज नाही. योग्य कुंडी, चांगली माती, सूर्यप्रकाश, जपून पाणी देणे आणि नियमित पेरणी या गोष्टी लक्षात ठेवल्यास, तुमची छोटी बाल्कनी किंवा खिडकीही तुमची मिनी हर्ब गार्डन बनू शकते.