तुमच्या लहानशा बाल्कनीमध्ये PVC पाइपचा वापर करून तुम्ही सहजपणे कोथिंबीर आणि पुदिना उगवू शकता. कमी जागेत सुंदर आणि सेंद्रिय किचन गार्डन बनवण्याची ही सोपी पद्धत जाणून घ्या.
तुमच्या घराची बाल्कनी लहान आहे का? पण तरीही तुम्हाला तिथे ताज्या, ऑर्गेनिक भाज्या उगवायच्या आहेत? तर मग घरात पडून असलेले जुने PVC पाइप्स तुमच्यासाठी एक भारी जुगाड ठरू शकतात. बाल्कनीमध्ये PVC पाइपच्या मदतीने तुम्ही एक सुंदर किचन गार्डन तयार करू शकता. हा एक बजेट-फ्रेंडली मार्ग आहे, ज्यात कमी खर्चात ताजी कोथिंबीर, पुदिन्यापासून ते पालक, मेथीपर्यंत सर्व काही उगवून खाऊ शकता. चला तर मग बघूया, लहान बाल्कनीमध्ये PVC पाइपचा वापर कसा करायचा?

PVC पाइपची कटिंग करा
जुन्या PVC पाइपपासून प्लांटर बनवण्यासाठी, सर्वात आधी 4 ते 6 इंच रुंदीचे पाइप घ्या. आता या पाइपवर तुम्हाला गोल किंवा आयताकृती (रेक्टँगल) कट मारायचे आहेत, जिथे तुम्ही रोपं लावणार आहात. यानंतर, पाइपची दोन्ही टोकं बंद करा आणि खालच्या बाजूला ड्रेनेज होल (पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र) करायला विसरू नका, जेणेकरून मातीत जास्त पाणी साचणार नाही. तुम्ही हे पाइप बाल्कनीच्या भिंतीवर किंवा रेलिंगला दोरीच्या मदतीने घट्ट बांधू शकता.
PVC पाइपमध्ये माती भरा
आता तुम्हाला पाइपमध्ये सुपीक माती भरायची आहे. रोपांची चांगली वाढ हवी असेल, तर मातीत शेणखत किंवा कंपोस्ट खत नक्की मिसळा. त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याच्या बिया किंवा लहान रोपं मातीत लावा. सुरुवातीला माती ओलसर राहील इतकंच पाणी द्या. पाइपला रोज किमान 3 ते 4 तास ऊन मिळेल याची काळजी घ्या. कोथिंबीर साधारण 20 ते 25 दिवसांत तयार होते, तर पुदिना खूप वेगाने वाढतो आणि तुम्ही तो वारंवार वापरू शकता. जर पानं सुकत असतील, तर ती काढून टाका आणि महिन्यातून एकदा पाइपमध्ये खत नक्की टाका. यामुळे तुमची रोपं जास्त काळ हिरवीगार राहतील.
कमी पाण्याचा वापर करा
PVC पाइप गार्डनिंगमध्ये पाणी खूप कमी लागतं आणि आजूबाजूला पसाराही होत नाही. त्यामुळे, जर तुमच्या घराची बाल्कनी खूपच लहान असेल, तर त्यात हिरवीगार रोपं उगवण्यासाठी हा पर्याय बेस्ट आहे. थोडी मेहनत आणि योग्य काळजी घेतली की तुम्ही घरच्या घरी ताज्या भाज्या मिळवू शकता.


