- Home
- lifestyle
- Switch Board Cleaning : घरातील स्विच बोर्ड्स काळे-पिवळे पडलेत? या सोप्या ट्रिक्सने नव्यासारखे चमकवा
Switch Board Cleaning : घरातील स्विच बोर्ड्स काळे-पिवळे पडलेत? या सोप्या ट्रिक्सने नव्यासारखे चमकवा
घरात आपण रोज स्विच बोर्ड्स वापरतो. सतत हात लागल्याने ते खूप घाण होतात. ही साचलेली घाण काढणं कठीण वाटतंय का? काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही त्यांना अगदी नव्यासारखं चमकवू शकता.

switch board cleaning
दिवाळीचा सण जवळ आलाय. सण म्हटला की आपण संपूर्ण घर साफ करतो. घराचा कोपरा न् कोपरा आपण स्वच्छ करतो, पण एका गोष्टीकडे बहुतेकांचं लक्ष जात नाही, ती म्हणजे स्विच बोर्ड्स. रोजच्या वापरामुळे, हातांचे ठसे आणि धुळीमुळे पांढरे स्विच बोर्ड्स पिवळे आणि खराब दिसू लागतात. यामुळे सुंदर भिंतींचा लूकही बिघडतो. पण तुम्ही काळजी करू नका. या दिवाळीत तुम्ही घरातील स्विच बोर्ड्स सुरक्षितपणे आणि सहज साफ करून नव्यासारखे चमकवू शकता.

तेलकटपणा आणि घाण काढण्यासाठी..
स्विच बोर्डवरील वरची धूळ काढण्यासाठी आधी कोरडं मायक्रोफायबर कापड वापरा. हे कापड पृष्ठभागावरील धूळ आणि हलकी घाण सहज शोषून घेतं. स्विच बोर्डच्या कडांभोवती कापड हलक्या हाताने फिरवा. साफसफाई करण्यापूर्वी संबंधित सर्किट बंद करणं अत्यंत गरजेचं आहे. स्विच बोर्ड पूर्णपणे कोरडा असल्याची खात्री झाल्यावरच काम सुरू करा.
स्विच बोर्डच्या बाहेरील प्लास्टिकवर तेलकट किंवा काळे डाग असतील, तर सौम्य साबणाचं पाणी उत्तम काम करतं. एक मऊ कापड साबणाच्या पाण्यात बुडवा आणि चांगलं पिळून घ्या. त्यानंतर त्या कापडाने स्विच बोर्ड पुसून घ्या. कापडातून पाण्याचा एकही थेंब गळणार नाही याची काळजी घ्या. छिद्र, स्विच किंवा सॉकेटच्या आत ओलावा जाणार नाही याची विशेष काळजी घ्या.
पिवळा रंग आल्यास..
घर साफ करण्यासाठी लोक सहसा बेकिंग सोडा वापरतात, पण स्विच बोर्डवर त्याची पेस्ट थेट लावणं अजिबात योग्य नाही. यामुळे प्लास्टिकवर ओरखडे तर पडतातच, शिवाय ओलावा आत जाण्याचा धोकाही असतो. म्हणूनच आधी कोरडं कापड किंवा साबणाचं पाणीच वापरा. हट्टी डाग असतील तर फक्त कंपनीने सुचवलेला खास क्लिनरच वापरा.
स्विच बोर्ड पिवळा पडण्यामागे फक्त घाणच कारणीभूत नसते. जुनं प्लास्टिक, आतील उष्णता किंवा सूर्यप्रकाशामुळेही प्लास्टिकचा रंग बदलतो. अशा वेळी साध्या साफसफाईने ते पुन्हा पांढरं होणार नाही. त्यासाठी कडक रसायने, ब्लीच किंवा घासणी अजिबात वापरू नका. रंग पूर्णपणे बदलला असेल तर जुनी प्लेट बदलून नवीन लावणं हाच योग्य उपाय आहे.
स्विच बोर्ड कायम नवा दिसावा यासाठी..
दर आठवड्याला कोरड्या कापडाने धूळ झटकल्यास घाण साचत नाही. स्विच बोर्डवर थेट पाणी किंवा क्लिनर लिक्विड कधीही फवारू नका. पॉवर सुरू असताना ओल्या कापडाचा स्पर्श अजिबात करू नका.

