पहिल्या नजरेतलं प्रेम की हळूहळू फुलणारं नातं, यातलं नक्की काय टिकतं? मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, सुरुवातीचे ९० दिवस तुमच्या नात्याचं भविष्य ठरवतात. या 'कंपॅटिबिलिटी विंडो'बद्दल सर्वकाही जाणून घ्या.
मुंबई : सिनेमांमध्ये पहिल्या नजरेतल्या प्रेमाला आपण नेहमीच टाळ्या वाजवतो. कुणीतरी भेटतं, नजरा भिडतात आणि हेच आपलं सर्वस्व आहे असं वाटायला लागतं. पण दुसरीकडे, अनेक जण नात्यात घाई न करता हळूहळू पुढे जाण्याचा सल्ला देतात. यातलं नक्की बरोबर काय? पटकन प्रेमात पडणं चुकीचं आहे का, की सावकाश पुढे जाणं जास्त योग्य ठरतं?
या गोंधळात आता रिलेशनशिप कोचेस एका नव्या थिअरीबद्दल बोलत आहेत. याला ते 'कंपॅटिबिलिटी विंडो' असं म्हणतात.
ही कंपॅटिबिलिटी विंडो नक्की काय आहे?
मानसोपचारतज्ज्ञ सांगतात की, कोणत्याही नात्यातले पहिले ३० ते ९० दिवस ही कंपॅटिबिलिटी विंडो असते. या काळात आपल्या मेंदूत डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन्सचा पूर आलेला असतो. पहिल्या नजरेतल्या प्रेमात आपण प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या प्रेमात पडत नाही, तर आपण त्यांच्या एका प्रतिमेच्या प्रेमात पडतो. ती व्यक्ती एकदम परफेक्ट आहे, असंच आपल्याला वाटत असतं.
पण ९० दिवसांचा टप्पा पार केल्यावर या हार्मोन्सचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यानंतर ती खरी व्यक्ती समोर येते. त्यांचा राग, त्यांच्या रोजच्या सवयी, त्यांची मूल्यं, पैशांबाबतचा त्यांचा दृष्टिकोन आणि कुटुंबाबद्दलचे त्यांचे विचार — हे सगळं स्पष्ट दिसायला लागतं.
तुम्ही दोघे खरोखर एकमेकांसाठी योग्य आहात की नाही, हे फक्त हीच विंडो तुम्हाला सांगू शकते.
पहिल्या नजरेतल्या प्रेमात मुख्य अडचण काय असते?
तुम्ही जेव्हा पहिल्या नजरेत प्रेमात पडता, तेव्हा तुमची केमिस्ट्री १०० टक्के असते, पण तुमची कंपॅटिबिलिटी शून्य टक्के असते. भांडण झाल्यावर ही व्यक्ती कशी वागते किंवा तणावाच्या वेळी ती परिस्थिती कशी हाताळते, याची तुम्हाला काहीच कल्पना नसते. म्हणूनच, ही विंडो बंद होताच असे घाईघाईत जुळलेले रोमान्स अनेकदा कोसळतात.
'गो स्लो' पॉलिसी का चांगली आहे?
हळूहळू पुढे जाणं म्हणजे प्रेमात पडायला उशीर करणं असा होत नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की, तुम्ही या विंडोचा हुशारीने वापर करता. या ९० दिवसांत तुम्ही जाणीवपूर्वक या ५ गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत:
१. कॉन्फ्लिक्ट विंडो: एखाद्या गोष्टीवर मतभेद झाल्यावर ते काय करतात? ते तुमच्यावर ओरडतात की शांत बसून बोलून प्रश्न सोडवतात?
२. स्ट्रेस विंडो: कामाचा ताण असताना किंवा तुमचा दिवस खराब गेल्यावर ते तुम्हाला सपोर्ट करतात, की तुमच्यापासून दूर राहतात?
३. व्हॅल्यूज विंडो: पैसा, लग्न, कुटुंब आणि करिअर याबद्दलचे त्यांचे विचार तुमच्या विचारांशी जुळतात का?
४. फ्रेंड्स अँड फॅमिली विंडो: तुमचे मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत ते कसे वागतात?
५. बोअरडम विंडो: फॅन्सी डेट्सच्या पलीकडे, एकमेकांसोबत साधा आणि कंटाळवाणा वेळ घालवणं तुम्हाला खरोखर आवडतं का?
या ९० दिवसांत तुम्ही दोघेही या ५ विंडोज चांगल्या प्रकारे हाताळत आहात आणि भांडणानंतरही एकमेकांबद्दल आदर कायम आहे, हे जर तुम्हाला दिसलं, तर तुमचं पहिल्या नजरेतलं प्रेम केवळ आकर्षण नव्हतं हे समजून जा. ते आता खऱ्या कंपॅटिबिलिटीमध्ये यशस्वीपणे बदललं आहे.
तज्ज्ञांच्या मते, पहिल्या नजरेत प्रेमात पडणं पूर्णपणे ठीक आहे. त्यात काहीही गैर नाही. पण आपण एकमेकांसाठीच बनलो आहोत, हे जाहीर करण्यापूर्वी स्वतःला ही ९० दिवसांची कंपॅटिबिलिटी विंडो नक्की द्या. ही 'गो स्लो' पॉलिसीच तुमचं नातं दीर्घकाळ टिकवून ठेवते.


