Cornell Scientists Identify 45 Potentially Habitable Earth : कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी आपल्या सूर्यमालेबाहेरील ६,००० हून अधिक ग्रहांचा अभ्यास केला आहे. या अभ्यासात पृथ्वीसारखे ४५ ग्रह सापडले आहेत, जे त्यांच्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर असून तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. 

Cornell Scientists Identify 45 Potentially Habitable Earth : आपल्या सूर्यमालेबाहेर हजारो ग्रह आहेत, हे शास्त्रज्ञांना खूप आधीपासून माहीत आहे. पण एखादा ग्रह असणं आणि तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता असणं, यात खूप मोठं अंतर आहे. याच दिशेने एक मोठं पाऊल टाकत कॉर्नेल युनिव्हर्सिटीच्या कार्ल सेगन इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी एक नवीन शोध लावला आहे. प्रोफेसर लिसा कॅलटेनेगर यांच्या नेतृत्वाखालील टीमने सूर्यमालेबाहेरील ६,००० पेक्षा जास्त ग्रहांचा सखोल अभ्यास केला. यातून त्यांना पृथ्वीसारखे तब्बल ४५ ग्रह सापडले आहेत, जे राहण्यायोग्य क्षेत्रात (habitable zone) आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

हे ४५ पृथ्वीसारखे ग्रह कसे शोधले?

या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी आता बंद पडलेल्या ESA च्या 'गाया स्पेस मिशन' आणि NASA च्या 'एक्सोप्लॅनेट आर्काइव्ह'मधील डेटा वापरला. प्रत्येक ग्रह त्याच्या ताऱ्यापासून किती ऊर्जा घेतो, यावरून तो 'हॅबिटेबल झोन'मध्ये आहे की नाही हे ठरवण्यात आलं. थोडक्यात सांगायचं तर, जिथे पाणी द्रवरूपात राहू शकतं आणि जीवसृष्टीसाठी पोषक वातावरण असू शकतं, असा हा भाग असतो. आपली पृथ्वी याच क्षेत्रात आहे, तर शुक्र आणि मंगळ ग्रह याच्या सीमेवर आहेत. हेच निकष लावून इतर ताऱ्यांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रहांचा अभ्यास केला असता, ४५ ग्रह राहण्यायोग्य क्षेत्रात असल्याचं दिसून आलं. यापैकी २४ ग्रह तर अधिक अचूक आणि अनुकूल स्थितीत आहेत.

या शोधातले काही ग्रह खूपच खास आहेत. यात आपल्यापासून सुमारे ४० प्रकाशवर्ष दूर असलेल्या TRAPPIST-1 नावाच्या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांचा समावेश आहे. या टीममधील एक मुख्य संशोधक, गिलिस लॉरी यांनी TRAPPIST-1 e आणि TOI-715 b या ग्रहांवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. TOI-715 b हा एक 'सुपर-अर्थ' मानला जातो, म्हणजे तो पृथ्वीपेक्षा मोठा पण खडकाळ ग्रह आहे. याशिवाय प्रॉक्सिमा सेंटॉरी बी आणि LHS 1140 b या ग्रहांनीही शास्त्रज्ञांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आता या ग्रहांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप, एक्सट्रीमली लार्ज टेलिस्कोप आणि हॅबिटेबल वर्ल्ड्स ऑब्झर्व्हेटरी यांसारख्या शक्तिशाली दुर्बिणींची मदत घेतली जाणार आहे. अर्थात, एखादा ग्रह राहण्यायोग्य क्षेत्रात आहे म्हणजे तिथे जीवसृष्टी आहेच, असं ठामपणे म्हणता येत नाही. पण 'या विश्वात आपण एकटेच आहोत का?' या मानवाच्या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल नक्कीच आहे.