Christmas Home Decor : ख्रिसमसच्या शेवटच्या मिनिटांतही घर सुंदर सजवता येतं. दिवे, फेरी लाइट्स, साध्या वस्तू, DIY सजावट आणि ख्रिसमस ट्रीच्या मदतीने कमी वेळात घराला सणासुदीचा लूक देता येतो. थोडी कल्पकता आणि आनंदी वातावरणाने ख्रिसमस अधिक खास बनतो.

Christmas Home Decor : ख्रिसमस हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. घर सजवून सणाचा माहोल तयार करणं ही या सणाची खास ओळख आहे. मात्र धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेक वेळा ख्रिसमसच्या अगदी शेवटच्या क्षणी सजावटीची आठवण होते. अशा वेळी कमी वेळात, कमी खर्चात आणि सहज उपलब्ध वस्तूंमधून घराला ख्रिसमससाठी सुंदर डेकॉर करणं शक्य आहे. थोडी कल्पकता आणि योग्य आयडियाज वापरल्यास शेवटच्या मिनिटांतही घरात ख्रिसमसचा झगमगाट आणता येतो.

दिवे आणि फेरी लाइट्सने बदला घराचा लूक

शेवटच्या मिनिटांत घर सजवायचं असेल तर दिवे आणि फेरी लाइट्स हा सर्वात सोपा आणि प्रभावी पर्याय आहे. खिडक्या, दरवाजे, बाल्कनी किंवा पडद्यांच्या कडेला फेरी लाइट्स लावल्याने घराला लगेच सणासुदीचा लूक मिळतो. पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे लाइट्स अधिक उबदार वातावरण तयार करतात. घरात आधीपासून असलेले एलईडी दिवे, मेणबत्त्या किंवा कंदील वापरूनही सुंदर सजावट करता येते.

साध्या वस्तूंमधून टेबल आणि कोपऱ्यांची सजावट

घरातील टेबल, शेल्फ किंवा कोपरे सजवण्यासाठी महागड्या वस्तूंची गरज नाही. लाल-हिरव्या रंगाचा टेबल क्लॉथ, मेणबत्त्या, काचेच्या बाटल्यांत ठेवलेले दिवे किंवा लहान सजावटीचे शोपीस वापरता येतात. फुलझाडांच्या कुंड्या, पाइन कोन, सुक्या फांद्या किंवा रिबन वापरून नैसर्गिक डेकॉर करता येतो. हे छोटे बदल घराला ख्रिसमस फील देतात.

 भिंती आणि दरवाजांवर सोपी ख्रिसमस सजावट

भिंती आणि मुख्य दरवाजा सजवणं ख्रिसमस डेकॉरमध्ये महत्त्वाचं असतं. शेवटच्या मिनिटांत तयार होणाऱ्या वॉल हॅंगिंग्स, पेपर स्टार्स, सांताक्लॉज किंवा स्नोफ्लेक्स वापरता येतात. मुख्य दरवाज्यावर साधा व्रिथ (Christmas Wreath) लावल्यास घरात येतानाच सणाचा आनंद मिळतो. कागद, रंगीत कापड किंवा जुने कार्ड्स वापरून DIY सजावट करता येते.

ख्रिसमस ट्री आणि कोपऱ्यांची आकर्षक मांडणी

ख्रिसमस ट्री हा या सणाचा केंद्रबिंदू असतो. वेळ कमी असेल तर लहान टेबल ट्री किंवा वॉल ट्रीचा पर्याय निवडता येतो. घरात उपलब्ध असलेले लाइट्स, बॉल्स, रिबन आणि बेल्स वापरून ट्री सजवता येतो. ट्रीजवळ गिफ्ट बॉक्स, सॉक्स किंवा सांताची छोटी मूर्ती ठेवल्यास सजावट अधिक आकर्षक दिसते. एखाद्या कोपऱ्यात ही मांडणी केल्यास संपूर्ण घराला ख्रिसमसचा लूक मिळतो.

सुगंध आणि संगीताने पूर्ण करा सजावट

सजावट केवळ दिसण्यापुरती मर्यादित नसते. घरात सौम्य सुगंधी मेणबत्त्या, दालचिनी, संत्र्याची साले किंवा अरोमा डिफ्यूजर वापरल्यास वातावरण अधिक आनंदी होतं. यासोबत हलकं ख्रिसमस म्युझिक किंवा कॅरोल्स लावल्यास सणाचा उत्साह द्विगुणित होतो. शेवटच्या मिनिटांत केलेली ही छोटी भर सजावटीला पूर्णत्व देते.