2026 मध्ये ऍपलचा धुमाकूळ! फोल्डेबल आयफोनसह अनेक प्रोडक्ट्स येणार
Apple Upcoming iPhones : दरवर्षीप्रमाणे, 2026 मध्येही ऍपल ब्रँड अनेक नवीन गॅजेट्स बाजारात आणणार आहे. यापैकी काही सध्याच्या उपकरणांच्या अपडेटेड आवृत्त्या असतील. तर आयफोन फोल्डसारखे काही नवीन प्रोडक्ट्स लाँच केले जातील.

ऍपल 2026
9To5Mac च्या रिपोर्टनुसार, ऍपलच्या 2026 च्या उपकरणांमध्ये OLED मॅकबुक प्रो, नवीन स्टुडिओ डिस्प्ले, होम हब, पहिला फोल्डेबल आयफोन आणि नवीन एन्ट्री-लेव्हल मॅकबुक यांचा समावेश असू शकतो. पुढील वर्षी ऍपलकडून अपेक्षित असलेल्या उपकरणांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नवीन स्टुडिओ डिस्प्ले
2026 च्या सुरुवातीला ऍपल एक नवीन मॅक डिस्प्ले सादर करू शकते. तपशील मर्यादित असले तरी, नवीन स्टुडिओ डिस्प्ले मॉडेलमध्ये 27-इंचाचा मिनी-एलईडी पॅनेल असेल अशी चर्चा आहे. सध्याच्या स्टुडिओ डिस्प्लेमधील A13 बायोनिक चिपऐवजी नवीन मॉडेलमध्ये A19 प्रो चिप दिली जाईल, असे संकेत आहेत.
ऍपल होम हब
रिपोर्ट्सनुसार, ऍपल 'होमपॉड' स्टाईलच्या डिव्हाइसवर काम करत आहे. यात 7-इंचाचा डिस्प्ले, A18 चिप, इन-बिल्ट कॅमेरा आणि स्पीकर यांसारखी दमदार फीचर्स असतील. हे स्मार्ट होम उपकरणांसाठी हब म्हणून काम करेल. यात A18 चिप वापरली जाऊ शकते. होमपॉडमध्ये नवीन विजेटसह homeOS इंटरफेस सादर केला जाऊ शकतो, जो आयफोनच्या स्टँडबाय मोडसारखा असेल. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टीम युजर्सना फेसटाइमसारख्या आयफोनच्या काही प्रमुख फीचर्सचा वापर करण्याची परवानगी देऊ शकते.
मॅकबुक प्रो
ऍपलचा 2026 मॅकबुक प्रो मॉडेल काही महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येईल. नवीन डिस्प्ले तंत्रज्ञानाव्यतिरिक्त, यात पातळ आणि हलकी बॉडी तसेच पुढच्या पिढीची M6 चिप्स असण्याची शक्यता आहे. M6 मॅकबुक प्रो 2nm आर्किटेक्चरवर तयार केला जाईल, ज्यामुळे परफॉर्मन्स आणि पॉवर एफिशियन्सीमध्ये सुधारणा होईल. तसेच, हा 5G कनेक्टिव्हिटी असलेला ऍपलचा पहिला मॅक असू शकतो, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
पहिला फोल्डेबल आयफोन
रिपोर्ट्सनुसार, ऍपल आयफोन फोल्ड सादर करून आयफोनमध्ये मोठे बदल करण्याची योजना आखत आहे. या डिव्हाइसमध्ये क्लॅमशेलऐवजी बुक-स्टाईल फोल्डेबल डिझाइन असू शकते. यात 7.8-इंचाचा आतील डिस्प्ले आणि 5.5-इंचाचा बाहेरील डिस्प्ले असेल. ऍपल डिस्प्ले क्रीज कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तसेच, फेस आयडीऐवजी टच आयडी वापरला जाऊ शकतो. फोल्ड केल्यावर याची जाडी 9 ते 9.5 मिमी आणि उघडल्यावर 4.5 ते 4.8 मिमी असेल, अशी माहिती आहे.
स्वस्त किंमतीतील मॅकबुक
2026 मध्ये ऍपल एक नवीन एन्ट्री-लेव्हल मॅकबुक सादर करेल अशी अपेक्षा आहे. हे मॅकबुक एअरपेक्षा स्वस्त असेल. या डिव्हाइसमध्ये 13-इंचाचा डिस्प्ले आणि A18 प्रो चिप असेल. हाय-एंड मॅकबुक एअर आणि मॅकबुक प्रो मधील एम-सीरिज प्रोसेसरऐवजी आयफोन-क्लास ए-सीरिज ऍपल सिलिकॉन चिप वापरणारे हे पहिले मॅकबुक मॉडेल असेल. ऍपल हे मॅकबुक मॉडेल नवीन रंगांमध्ये सादर करेल, असेही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.

