Angaraki Sankashti Chaturthi 2025 : जाणून घ्या व्रत, पूजा पद्धती आणि पौराणिक महत्त्व
पुणे - आज मंगळवारी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी गणपतीच्या मदिरात जाऊन गणपतीचा आशिर्वाद घेतला जातो. या दिवशी केलेला व्रत पूर्ण होतो अशी मान्यता आहे. जाणून घ्या आजच्या दिवसाचे महत्त्व, पूजा विधी, व्रत आणि इतर माहिती.

जीवनातील अडथळे दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा लाभते
“वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥”
हिंदू धर्मात संकष्ट चतुर्थी हे गणपती बाप्पाचे अतिशय महत्त्वाचे व्रत मानले जाते. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला हे व्रत पाळले जाते. विशेष म्हणजे ही चतुर्थी मंगळवारी आली, तर तिला अंगारक संकष्ट चतुर्थी असे म्हणतात. ‘अंगारक’ म्हणजे मंगळ. श्रद्धेनुसार, या दिवशी व्रत केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि श्री गणेशाची कृपा लाभते.
अंगारक संकष्ट चतुर्थी २०२५ ची तिथी आणि वेळा
या वर्षी श्रावण महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवार, १२ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ८:४० वाजता सुरू होईल आणि बुधवार, १३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ६:३६ वाजता समाप्त होईल. मुंबई व ठाणे येथे चंद्रोदयाची वेळ रात्री ९:१७ आहे.
पूजेसाठी लागणारे साहित्य
श्रीफळ, हळद, कुंकू, गुलाल, दुर्वा, जास्वंदाची फुले, शेंदूर, चंदन, रक्तचंदन, कापूर, अष्टगंध, अक्षता, उदबत्ती, धूप, समई, फुले-फळे, नैवेद्य इत्यादी वस्तूंचा समावेश करावा. तसेच पंचामृतासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर आवश्यक आहे.
व्रत आणि पूजा पद्धती
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. दिवसभर उपवास पाळावा आणि संकल्प करावा. धातूच्या श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने अभिषेक करावा. अभिषेक करताना गणपती मंत्राचा १०८ वेळा जप करावा. श्री गणपतीस्तोत्र, अथर्वशीर्ष किंवा संकष्टनाशन स्तोत्राचे पठण करावे. चंद्रोदयाच्या वेळी धूप, दीप, फुले-फळे अर्पण करून बाप्पाला नैवेद्य द्यावा. त्यानंतर चंद्रदर्शन करून अर्घ्य अर्पण करावे आणि उपवास सोडावा.
व्रताचे लाभ
श्रद्धेनुसार, या व्रतामुळे श्री गणेशाची कृपादृष्टी लाभते, संकटे आणि ग्रहदोष दूर होतात, आरोग्य सुधारते आणि आयुष्यात समृद्धी वाढते. कुटुंबाची भरभराट होते. पुढील दिवस सकारात्मक जाऊन मन प्रसन्न राहते. या दिवशी केलेली पूजा सत्कर्मी लागते. गणपतीचा आशिर्वाद मिळतो.
पौराणिक कथा
प्राचीन काळी अवंती नगरीत क्षिप्रा नदीच्या तीरावर भारद्वाज मुनी राहत होते. ते श्री गणेशाचे मोठे भक्त होते, पण त्यांना संतान नव्हते. एकदा नारद मुनी त्यांच्या समोर एक लालसर, तेजस्वी बालक घेऊन आले आणि सांगितले की हे गणेशाचे प्रसाद आहे. मुनींनी त्याला ‘अंगारक पुत्र’ असे नाव दिले.
गणपती बाप्पा प्रकट झाले
अंगारक लहानपणापासून वेदविद्या शिकला आणि गणेशभक्त झाला. त्याने नर्मदेची परिक्रमा करून एका शांत ठिकाणी कठोर आराधना केली. संकष्ट चतुर्थीच्या रात्री चंद्रोदयाच्या वेळी ध्यान करत असताना गणपती बाप्पा प्रकट झाले आणि वर मागण्यास सांगितले. अंगारक म्हणाला, “मला धन-मान काही नको, तुमच्यात विलीन होण्याची मुक्ति द्या.” गणेश म्हणाले, “तथास्तु! आज मंगळवार आणि संकष्ट चतुर्थी असल्याने या दिवसाला ‘अंगारक चतुर्थी’ म्हणून ओळखले जाईल. या दिवशी व्रत करणाऱ्यांना एकवीस संकष्ट चतुर्थींचे पुण्य लाभेल.”
तेव्हापासून अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रत भक्तिभावाने साजरे केले जाते.

