YouTuber Bhoomika: स्वप्न पाहणं सोपं असतं, पण ती पूर्ण करण्यासाठी जिद्द लागते. लोकप्रिय युट्यूबर भूमिका बसवराज हिने आपली जिद्द पूर्ण करत सर्वांची मनं जिंकली आहेत.

लोकप्रिय युट्यूबर भूमिकानं तिचं खूप दिवसांचं स्वप्न असलेली 'महिंद्रा थार रॉक्स 4x4' (Thar Roxx) कार खरेदी केली आहे. फक्त गाडी घेणं एवढंच नाही, तर यामागे तिचा हट्ट, कुटुंबाचा विरोध आणि सेलिब्रेशनचे अनेक किस्से आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

थारसाठी भूमिकानं २ दिवस जेवणच सोडलं!

या गाडीच्या खरेदीमागे एक मोठी गोष्ट असल्याचं भूमिकानं सांगितलं. सुरुवातीला घरच्यांनी "ही एवढी मोठी गाडी तुला सूट होणार नाही" असं म्हणत नकार दिला होता. पण, मला हीच गाडी हवी असा हट्ट भूमिकानं धरला. घरच्यांशी भांडून तिने चक्क दोन दिवस जेवणही केलं नव्हतं! अखेर तिची मेहनत फळाला आली. बंगळुरूमध्ये २-३ दिवस सलग शूटिंग करून, रात्रीची झोप मोडून तिने आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं.

"हत्तीला चारा कसा घालायचा?"

गाडीच्या डिलिव्हरीवेळी भूमिकाच्या वडिलांनी एक भारी जोक मारला. "मुलगी घरी चक्क हत्ती घेऊन येत आहे, आता याला चारा (मेंटेनन्स/पेट्रोल) कसा घालायचा याचीच मला चिंता लागलीये," असं ते हसत हसत म्हणाले. त्यानंतर त्यांनीच पहिल्यांदा लेकीच्या नव्या गाडीचं स्टिअरिंग हातात घेतलं आणि गाडी चालवली. त्यांच्या चेहऱ्यावरचा अभिमान लपून राहिला नाही.

आईच्या डोळ्यात पाणी आणि दीपक्काची आठवण

भूमिका आणि तिची आई एकदा भाजी मार्केटमध्ये गेल्या होत्या. तिथे रस्त्यावर एक गाडी पाहून आई म्हणाली होती, "मला ही गाडी खूप आवडली, आपण घेऊया." आईचे तेच शब्द आज भूमिकानं खरे करून दाखवले आहेत. या आनंदाच्या क्षणी कुटुंबातील एक महत्त्वाची व्यक्ती, दीपक्का यांची उणीव सर्वांना जाणवत होती. "आज त्या असत्या तर माझ्यापेक्षा जास्त खुश झाल्या असत्या," असं म्हणत भूमिकानं अश्रू ढाळले. तिने दीपक्का यांचा फोटो गाडीसमोर ठेवून पूजा केली.

'ब्लॅक अँड रेड' थीम

या कार्यक्रमाला आलेले सगळे जण काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होते, तर भूमिका रॉयल रेड ड्रेसमध्ये उठून दिसत होती. डिलिव्हरी आणि जेवण झाल्यानंतर, कुटुंबाने सिद्धरबेट्टा किंवा मुळ्ळय्यनगिरी मंदिरात जाऊन विशेष पूजा करण्याचं ठरवलं. त्यानंतर चिक्कमंगळुरूच्या मळ्यांमधील रस्त्यांवर त्यांनी थारच्या पहिल्या ऑफ-रोडिंगचा अनुभव घेतला.

घरच्यांचा विरोध असतानाही एका मुलीनं हट्ट धरला आणि शेवटी संपूर्ण कुटुंबाला अभिमान वाटेल असं काम केलं. तिचं हे यश सोशल मीडियावर खूप कौतुक मिळवत आहे.

सहसा ऑफ-रोडिंग, रफ अँड टफ जीप किंवा 'थार' (Mahindra Thar) सारख्या गाड्या मुलांना जास्त आवडतात, असा समाजाचा समज आहे. पण, एका तरुण मुलीनं स्वतःच्या कमाईतून अशी दमदार गाडी घेणं, हे अनेक मुलींसाठी स्वावलंबनाचं मोठं उदाहरण ठरलं आहे.

थोडक्यात सांगायचं तर, भूमिका फक्त व्हिडिओ बनवणारी युट्यूबर नाही, तर मेहनत आणि जिद्द असेल तर स्वतःच्या हिमतीवर कोणतंही मोठं स्वप्न पूर्ण करता येतं, हे सिद्ध करणारी एक तरुण आयडॉल आहे.