आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्ती अनेकदा एकटेपणा, असहाय्यता किंवा आपल्याला कोणीच महत्त्व देत नाहीये, अशा भावना बोलून दाखवतात. त्यांच्या बोलण्यातून एकटेपणाचं दुःख आणि निराशा स्पष्टपणे जाणवते.
दरवर्षी १० सप्टेंबर हा दिवस 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन' म्हणून पाळला जातो. आत्महत्या रोखणं आणि मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं, हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. या वर्षीची थीम आत्महत्येबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यावर भर देणारी आहे.
आत्महत्येच्या विचारांची धोक्याची लक्षणं वेळीच ओळखली, तर अशा व्यक्तीला योग्य वेळी तज्ज्ञांची मदत मिळवून देता येते. हे लक्षात ठेवा की, एखाद्याला आत्महत्येच्या विचारांबद्दल थेट विचारल्याने त्यांच्या मनात तसे विचार येत नाहीत, उलट मदतीचा एक मार्ग खुला होतो.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच आपलं जीवन संपवते, तेव्हा त्याला आत्महत्या म्हणतात. डिप्रेशन, बायपोलार डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया, मानसिक ताण, जास्त दारू पिणं किंवा ड्रग्जचं व्यसन यांसारख्या मानसिक आजारांमुळे येणारी निराशा हे आत्महत्येमागील एक प्रमुख कारण असतं.
याशिवाय आर्थिक अडचणी, नोकरी जाणं, गंभीर आजार, कौटुंबिक समस्या, नात्यांमधील तणाव, वंध्यत्व, सततचे वाद, अपराधीपणाची भावना, प्रेमभंग, परीक्षेत अपयश, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू किंवा बलात्कारासारख्या घटनेमुळे आलेला मानसिक धक्का, अशी अनेक कारणं आत्महत्येमागे असू शकतात.
आत्महत्येचा विचार करणाऱ्या व्यक्तींमध्ये दिसणारे बदल
मूडमध्ये अचानक आणि मोठे बदल होणं. त्यांची मनस्थिती खूपच गुंतागुंतीची वाटू शकते.
लोकांपासून दूर राहणं. मित्र, परिवार किंवा सामाजिक कार्यक्रमांपासून स्वतःला वेगळं करणं.
मृत्यूबद्दल बोलणं किंवा तसे संकेत देणं. अशा व्यक्ती आपल्या बोलण्यातून किंवा लिखाणातून असे इशारे देऊ शकतात.
एकटेपणा किंवा असहाय्यतेबद्दल बोलणं. 'आपल्याला कोणीच समजून घेत नाही' किंवा 'आपलं काहीच महत्त्व नाही' असं ते वारंवार बोलू शकतात.
आत्महत्या करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांचा विचार करणं. जसं की, शस्त्रं जवळ बाळगणं, मोठ्या प्रमाणात गोळ्या जमा करणं किंवा विषारी पदार्थ शोधून ठेवणं. या गोष्टी धोक्याची स्पष्ट सूचना देतात.
