जागतिक ध्यान दिन: प्रत्येक माणसाने 'मनाचा चमत्कार' अनुभवावा, सद्गुरूंचा संदेश

| Published : Dec 21 2024, 03:12 PM IST / Updated: Dec 21 2024, 03:13 PM IST

Sadhgurus
जागतिक ध्यान दिन: प्रत्येक माणसाने 'मनाचा चमत्कार' अनुभवावा, सद्गुरूंचा संदेश
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

२१ डिसेंबर हा दिवस संयुक्त राष्ट्रांनी जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला आहे. सद्गुरूंनी या निमित्ताने ध्यानाचे मानसिक आरोग्यासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले आहे आणि 'मिरॅकल ऑफ माइंड' ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे.

ध्यानाच्या परिवर्तनशील शक्तीला ओळखून संयुक्त राष्ट्रांनी एका ऐतिहासिक निर्णयात २१ डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित केला आहे. या गोष्टीचं महत्त्व अधोरेखित करताना ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू यांनी या संदर्भात एक संदेश दिला आहे.

एक्स (X) वर पोस्ट करताना सद्गुरू म्हणाले, "ध्यान ही अशी प्रक्रिया आहे ज्यामुळे तुम्ही या मनाला कसं वापरायचं हे शिकता, जेणेकरून ते एका चमत्काराप्रमाणे काम करेल. हे कौतुकास्पद आहे की, संयुक्त राष्ट्रांनी ध्यानाला मानसिक आरोग्य, भावनिक स्थिरता आणि संतुलन निर्माण करण्याचे एक साधन म्हणून मान्यता दिली आहे, ते सुद्धा अशा वेळी जेव्हा तज्ज्ञ एका जगव्यापी मनोविकाराच्या साथीची भविष्यवाणी करत आहेत. माझी इच्छा आणि आशीर्वाद आहे की, या पृथ्वीवरील प्रत्येक माणसाने मनाचा चमत्कार अनुभवावा. चला, आपण हे घडवून आणू या. -सद्गुरू"

 

 

“२१ डिसेंबर हा जागतिक ध्यान दिन म्हणून घोषित होणं महत्त्वाचं आहे, कारण आजच्या काळात मानवतेला भेडसावणाऱ्या सर्वात मोठ्या समस्या मानसिक स्थिरता, संतुलन आणि आरोग्य या आहेत,” सद्गुरूंनी त्यांच्या व्हिडिओ संदेशात सांगितलं.

सद्गुरूंनी मानवी मनाच्या क्षमता उलगडण्यात ध्यानाच्या भूमिकेवर जोर दिला. त्यांनी मनाला "सर्वात मोठा चमत्कार" म्हटलं आहे, पण दुर्दैवाने योग्य साधनांच्या अभावामुळे अनेकजण याला त्रासाचं कारण म्हणून अनुभवतात. "ध्यान ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे तुम्ही मन कसं वापरावं हे शिकता, जेणेकरून ते एक चमत्कार म्हणून कार्य करू शकेल."

जागतिक मोहिमेचा भाग म्हणून, सद्गुरूंनी पुढील वर्षी 'मिरॅकल ऑफ माइंड' हे ॲप प्रसारित करण्याची घोषणा केली. हे ॲप एक साधी ध्यान प्रक्रिया प्रदान करेल, जी कुठेही करता येईल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात शांती, आनंद आणि उत्साह जाणवेल.

"हे खरंच अद्भुत आहे की, भारत पुन्हा एकदा जगाला परिवर्तनाची साधने देण्यात आघाडीवर आहे. आनंदी, निरोगी आणि उत्साही माणसांची पिढी घडवण्याच्या दिशेने हे एक अतिशय महत्त्वाचं आणि लक्षणीय पाऊल आहे," असं संयुक्त राष्ट्रसंघ, भारत सरकार आणि या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सर्व देशांचे अभिनंदन करताना सद्गुरू म्हणाले.

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ, सद्गुरूंनी जगभरातील लाखो लोकांना लाभ होईल अशी योग आणि ध्यानाची साधने दिली आहेत. तीस लाखांहून अधिक लोकांनी इनर इंजिनिअरिंग केलं आहे, प्रमुख विद्यापीठांच्या संशोधनानुसार झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा, ताणतणावात ५०% घट आणि ऊर्जा, आनंद आणि उत्पादकता वाढ या गोष्टी आढळून आल्या.

सद्गुरूंनी मार्गदर्शित केलेल्या अनेक सरावांपैकी एक असलेली, १२ मिनिटांची मोफत ध्यान प्रक्रिया, ‘ईशा क्रिया’ सर्वांना सद्गुरू ॲपवर मोफत उपलब्ध आहे, ज्यामुळे दररोज असंख्य लोकांना जीवन बदलणारे लाभ अनुभवता येतात. सद्गुरू प्रगत ध्यान कार्यक्रम सुद्धा प्रदान करतात ज्यामध्ये, ‘शून्य’ ध्यान - जी एक प्रयत्नरहित जाणीवपूर्वक काही न-करण्याची प्रक्रिया आहे आणि ‘सम्यमा’ - ज्यामुळे सहभागींना चेतनेच्या उच्च अवस्थेकडे जाण्यास मदत होते.