सार
तरुणीचा डान्स पाहून आणि प्रोत्साहन देत गाडीभोवती लोक जमले होते. ते चलनी नोटाही फेकत होते.
झांशीतील उपविभागीय दंडाधिकाऱ्याच्या (एसडीएम) गाडीच्या बोनटवर एका तरुणीने डान्स केला. हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावरून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यानंतर गाडीच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या गाडीवर उत्तर प्रदेश सरकार आणि एसडीएम असे लिहिलेले दिसत आहे. एक तरुणी आणि एक तरुण गाडीच्या बोनटवर चढून नाचत आहेत. पार्श्वभूमीत भोजपुरी संगीत ऐकू येत आहे. सायरनचा आवाजही व्हिडिओमध्ये ऐकू येत आहे. तरुणीचा डान्स पाहून आणि प्रोत्साहन देत गाडीभोवती लोक जमले होते. ते चलनी नोटाही फेकत होते.
हा व्हिडिओ लवकरच सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अनेकांनी व्हिडिओतील घटनेवर टीका केली. या प्रकरणी दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील झांशी जिल्ह्यातील शाहजहानपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तदौल गावातील हा व्हायरल व्हिडिओ असल्याचे वृत्त आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये, व्हिडिओची पडताळणी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश शाहजहानपूर निरीक्षकांना झांशी पोलिसांनी दिले आहेत.
नंतर गाडीजवळ असलेल्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. "सोशल मीडियावरून आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. ही गाडी एसडीएमची आहे. त्या दिवशी ते तेथे नव्हते. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एसडीएमला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे," असे झांशीचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी म्हणाले.