- Home
- India
- Yellow City : जगाच्या मार्केटवर राज्य करणारी आपली 'हळदीची राजधानी' कोणती? भारतात आहे यलो सिटी
Yellow City : जगाच्या मार्केटवर राज्य करणारी आपली 'हळदीची राजधानी' कोणती? भारतात आहे यलो सिटी
Yellow City: भारतीय जेवणात आणि परंपरेत हळदीला खूप महत्त्व आहे. हळदीशिवाय आपलं कोणतंच काम होत नाही. पण आपल्या देशात पिकणारी ही हळद संपूर्ण जगाच्या मार्केटवर राज्य करते.

आपली हळदीची राजधानी
हळद म्हटलं की आपल्याला पावित्र्य आठवतं. हिंदू धर्मात कोणतंही शुभकार्य हळदीशिवाय पूर्ण होत नाही. जेवणाला रंग देण्यापासून ते घरगुती उपाय आणि पूजेपर्यंत हळद आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनली आहे. पण संपूर्ण जगाला हळद पुरवणारं आणि 'टर्मरिक सिटी' किंवा 'यलो सिटी' म्हणून ओळखलं जाणारं शहर कोणतं आहे, हे तुम्हाला माहितीये का? चला तर मग, भारतातील हळद उत्पादक शहरांबद्दल जाणून घेऊया.

जगाची हळदीची राजधानी
तामिळनाडूमधील इरोड शहराला जगभरात 'टर्मरिक कॅपिटल ऑफ द वर्ल्ड' किंवा 'यलो सिटी' म्हणून ओळखलं जातं. हळदीची शेती, व्यापार आणि मार्केटमधील भाव ठरवण्यात इरोड शहर जगात सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतं. इथं ठरलेले हळदीचे भावच देशभरात आणि आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी बेंचमार्क मानले जातात.
इरोडच्या हळदीत कुरकुमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे भारत सरकारने याला प्रतिष्ठेचा 'जीआय टॅग' (GI Tag) दिला आहे. या भागातील लाल माती आणि चांगल्या पावसामुळे इथं उत्तम दर्जाची हळद पिकते. तेलंगणातील निजामाबाद नंतर भारतातील सर्वात मोठी नियंत्रित हळदीची बाजारपेठ इरोडमध्येच आहे. इथून आशिया, युरोप, मिडल ईस्ट आणि अमेरिकेला हळद निर्यात केली जाते.
भारताची टर्मरिक सिटी
तामिळनाडूचं इरोड शहर जगाची हळदीची राजधानी असेल, तर महाराष्ट्रातील सांगली शहर 'टर्मरिक सिटी ऑफ इंडिया' म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास ७० टक्के हळद एकट्या सांगली जिल्ह्यात पिकते. आशिया खंडातील सर्वात जुन्या आणि मोठ्या हळद व्यापार केंद्रांपैकी हे एक आहे.
सांगलीच्या हळदीलाही 'जीआय टॅग' मिळाला आहे. इथली हळद दिसायला खूप आकर्षक असते आणि तिचा सुगंधही छान असतो. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून इथं हळदीचा लिलाव केला जातो.
आपल्या संस्कृतीत हळदीचं महत्त्व...
आपल्या संस्कृतीत हळद हा फक्त स्वयंपाकघरातील मसाला नाही. आयुर्वेदात हळदीला एक दिव्य औषध मानलं जातं. त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी ती मदत करते. सर्दी-खोकला कमी करण्यासाठी हळदीचं दूध एक उत्तम औषध म्हणून काम करतं. शुभकार्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही हळद आपल्या प्राचीन संस्कृतीचं प्रतीक आहे.
