Toor Dal Capital : देशाची तूर डाळ राजधानी कोणती? इथल्या डाळीची चव एकदम भारी
गरमागरम भात, त्यावर वरण आणि साजूक तूप… यापुढे कोणतीही बिर्याणी फिकी पडेल. पण या तूर डाळीची देशातील राजधानी कुठे आहे, हे तुम्हाला माहीत आहे का?

Land Of Toordal
आपल्या देशात रोजच्या जेवणात डाळ नक्कीच असते. डाळीशिवाय भारतीय जेवण पूर्ण होत नाही. डाळींचे अनेक प्रकार असले तरी, तूर डाळ ही सर्वांत जास्त आवडती आहे. आपल्या देशात अनेक ठिकाणी तूर डाळ पिकते. पण, या डाळीची एक खास राजधानी आहे. इथल्या डाळीची चव देशात इतर कुठेही मिळणार नाही. तर ती जागा कोणती? तिथल्या डाळीचं वैशिष्ट्य काय आहे?

तूर डाळीची राजधानी कोणती?
देशात अनेक ठिकाणी तूर डाळ पिकते. पण एका शहराने तूर डाळीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून दिली आहे. ते शहर म्हणजे कर्नाटकमधील कलबुर्गी. या शहराला भारताची 'लँड ऑफ तूर डाळ' म्हणतात. देशात सर्वांत जास्त तूर डाळ इथेच पिकवली जाते.
कलबुर्गी - तूर डाळीचं घर
कलबुर्गीला पूर्वी गुलबर्गा म्हणून ओळखलं जायचं. इथे मोठ्या प्रमाणावर तूर डाळ पिकते. इथल्या डाळीला 'गुलबर्गा तूर डाळ' म्हणतात. ही डाळ खूप दर्जेदार असते, म्हणूनच तिला 'GI टॅग' मिळाला आहे. कर्नाटक राज्यात तूर उत्पादनात हा जिल्हा आघाडीवर असल्यामुळे सरकारनेही कलबुर्गीला 'Toor Bowl' म्हणायला सुरुवात केली आहे.
इथल्या तूर डाळीचं वैशिष्ट्य काय?
कलबुर्गीच्या तूर डाळीची चव, सुगंध आणि शिजवण्याची पद्धत सामान्य डाळीपेक्षा वेगळी असते. नॅशनल पोर्टल ऑफ इंडियानुसार, या डाळीला ड्राय फ्रूटसारखी हलकी चव असते. शिजल्यावर ती एकदम मऊ आणि क्रीमी होते. म्हणूनच ही डाळ खूप चविष्ट लागते. या चवीचं रहस्य तिथल्या मातीत आहे. इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट (ICRISAT) नुसार, कलबुर्गीच्या मातीत कॅल्शियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असतं. हवामान आणि मातीमुळे डाळीला हा खास सुगंध आणि लवकर शिजण्याचा गुण मिळतो. या डाळीपासून बनवलेला कोणताही पदार्थ दुप्पट चविष्ट लागतो.
एका साध्या धान्यामुळे शहराला ओळख मिळणं ही मोठी गोष्ट आहे. अनेक दशकांपासून इथल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तूर डाळीने कलबुर्गीचं नाव कर्नाटकाबाहेर देशभरात पोहोचवलं आहे. देशभरात या डाळीला मोठी मागणी आहे.
