रील्स बनवण्याच्या नादात दोन तरुणी धबधब्याच्या कडेवरून घसरता घसरता वाचल्या. त्यांचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
मनोरंजनासाठी सुरुवात झालेल्या 'रील' संस्कृतीने आता थेट जीवावर बेतण्याची वेळ आली आहे. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोन तरुणी धबधब्याच्या अगदी टोकावर उभ्या असताना एकामागून एक घसरताना दिसतात. क्षणभर काय होईल याचा अंदाज न लागणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
धबधब्याच्या कडेवरचा थरार, दोन जीव थोडक्यात बचावले!
या व्हिडीओमध्ये दिसतं की, पहिली तरुणी धबधब्याच्या टोकाजवळ जाताच अचानक घसरते. तिचा तोल जातो, आणि ती थेट खाली कोसळण्याच्या सीमारेषेवर पोहोचते. नशिब बलवत्तर म्हणून ती बचावते. मात्र, जेव्हा सर्वजण सुटकेचा नि:श्वास घेत असतात, तेव्हाच दुसरी तरुणीही अगदी त्याच पद्धतीने पुढे येते… आणि तिही घसरते!
दुर्दैवाने नव्हे तर सुदैवाने दोघीही वाचतात. पण हा प्रसंग पाहून नेटकऱ्यांच्या मनात एकाच प्रश्नाने घर केलंय. "पहिली मुलगी घसरली हे दिसूनही दुसरीने तिथे जाण्याचा धोका का पत्करला?"
धोक्याचा सेल्फी आणि व्हायरलचा वेडापिसा हव्यास
'थोडं हटके करावं' म्हणून काही तरुण-तरुणी स्वत:चं आयुष्य धोक्यात टाकतात. व्हिडीओच्या दृश्यांतून स्पष्ट होतं की, त्या दोघी रील्ससाठी हे सगळं करत होत्या. पण हाच निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो, हे या व्हिडीओतून स्पष्ट होतंय.
व्हायरल क्लिप 'X'वर धुमाकूळ घालतेय
हा थरारक व्हिडीओ 'PalsSkit' नावाच्या 'X' (पूर्वीचं Twitter) हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. मजकुरात मिश्कीलपणे लिहिलं आहे. "पापा की परी एग्जाम समझ के कॉपी कर ली!" या पोस्टला बातमी लिहेपर्यंत ४७ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले होते आणि शेकडो युजर्स कमेंटमध्ये संताप, चिंता आणि शॉक व्यक्त करत आहेत.
नेटिझन्स संतप्त, “हे विनोदी नाही, वेडगळपणा आहे!”
एक युजर म्हणतो, “हे कुठल्याही अँगलने फनी नाही. दोघीही थोडक्यात वाचल्या, नाहीतर परिणाम गंभीर झाले असते.”
दुसऱ्याने लिहिलं, “ही दुसरी मुलगी तिथे परत कशाला गेली?”
तिसरी कमेंट “रीलच्या नादात जीवाशी खेळणं म्हणजे वेडेपणा. लक्षात ठेवा, व्ह्यूज कुठल्याही गोष्टींपेक्षा महत्त्वाचे नाहीत.”
व्ह्यूजपेक्षा ‘व्यू’ सांभाळा!
डोंगर-दऱ्यांमध्ये, धबधब्यांच्या कड्यावर किंवा समुद्रकिनाऱ्यांवर सेल्फी किंवा व्हिडीओ बनवणं म्हणजे फक्त स्टंट नाही, तर जिवाशी खेळणं आहे. एक चूक आणि सगळं संपू शकतं. हा व्हिडीओ एक इशारा आहे 'रिल्स'साठी 'रिअल' धोका पत्करू नका!


