आर्यवीरची द्विशतकी खेळी: वीरेंद्र सेहवागच्या मुलाने केली धमाकेदार कामगिरी
- FB
- TW
- Linkdin
वीरेंद्र सेहवाग.. क्रिकेट विश्वात कोणालाही परिचय करून द्यायची गरज नाही असे नाव. धडाकेबाज सलामीवीर म्हणून त्याने भारतासाठी अनेक अफलातून खेळी केल्या. प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आपल्या बॅटने वार करत त्याने अनेक विजय मिळवून दिले. आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगाही अफलातून खेळी करू लागला आहे. सेहवागचा मुलगा आर्यवीरने द्विशतक झळकावले आहे.
१७ वर्षांच्या वयात द्विशतक झळकावणारा आर्यवीर
भारताचा धडाकेबाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचे वय अवघे १७ वर्षे आहे. १८ ऑक्टोबर २००७ रोजी त्याचा जन्म झाला. दिग्गज फलंदाज सेहवागला जवळून पाहत वाढलेल्या आर्यवीरने त्याच्या वडिलांची खेळण्याची शैली आत्मसात केली आहे. २१ नोव्हेंबर रोजी शिलाँग येथील एमसीए क्रिकेट मैदानावर झालेल्या कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना आर्यवीरने द्विशतक झळकावत सनसनी माजवली. मेघालयाच्या गोलंदाजांवर त्याने धडाकेबाज फटकेबाजी केली. २२९ चेंडूत आर्यवीरने २००* धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या द्विशतकी खेळीमध्ये २ षटकार आणि ३४ चौकारांचा समावेश होता.
दिल्लीसाठी जबरदस्त खेळी
आर्यवीरच्या अफलातून खेळीमुळे दिल्ली संघ मेघालयावर मात करण्याच्या स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर दिल्लीने केवळ २ बळी गमावत ४६८ धावा केल्या आहेत. मेघालया संघ अजूनही दिल्लीपेक्षा २०८ धावांनी मागे आहे. गेल्या महिन्यात सेहवागचा मुलगा आर्यवीरने विनोद मांकड ट्रॉफीमध्ये पदार्पण केले होते. मणिपूरविरुद्धच्या सामन्यात त्याने ४९ धावा केल्या होत्या आणि अर्धशतकापासून अवघ्या १ धावेने हुकला होता. पण आता त्याने द्विशतक झळकावले आहे.
आर्यवीरबद्दल सेहवागने काय म्हटले आहे?
काही काळापूर्वी सेहवागने आपला मुलगा आर्यवीरबद्दल भाष्य केले होते. त्याचे दोन्ही मुलगे आपले करिअर निवडण्यासाठी स्वतंत्र आहेत आणि त्यांच्यावर क्रिकेटपटू व्हावे असा कोणताही दबाव नाही, असे त्याने स्पष्ट केले होते. केवळ सेहवागच नाही तर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड यांसारख्या दिग्गज क्रिकेटपटूंचे मुलगेही क्रिकेटमध्ये रस दाखवत आहेत. सचिनचा मुलगा अर्जुनने गेल्या वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केले होते हे सर्वांना माहीतच आहे.